पोलीस हादरले, नागरिकांमध्ये घबराट
वसई : नालासोपारा शहरातील हत्यांचे सत्र सुरूच असून एकाच महिन्यात तब्बल ७ जणांच्या हत्या झाल्या आहेत. यातील ३ हत्या या चोरीच्या उद्देशाने, २ हत्या किरकोळ वादातून आणि एक हत्या कौटुंबिक वादातून झाल्या आहेत.
नालासोपारा शहरातील गुन्हेगारी कमालीची वाढली आहे. एकाच महिन्यात शहरातील तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ७ हत्या झाल्या आहेत, तर तीन महिन्यांत १० हत्या झाल्या आहेत.
यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. होळीच्या दिवशी एका रेस्टॉरंटमध्ये जेवणाचे पार्सल घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला काही टोळ्यांनी क्षुल्लक वादातून मारहाण केली होती. बुधवारी त्याचा मृत्यू झाला. यामुळे हत्या झालेल्यांची संख्या ७ झाली आहे. एकाच महिन्यात ७ हत्या होणारे तुळींज हे पहिले आणि एकमेव पोलीस ठाणे आहे.
घटनाक्रम
१ मार्च : (३ हत्या) नालासोपाऱ्याच्या संख्येश्वर नगरमधील ओम साई चाळीत राहणाऱ्या कैलास देवेंद्र पाठकची (४८) मोबाइलसाठी हत्या. रिक्षाचालक अमोल जयराम इंगळे (३२) याच्यावर चोरांचा हल्ला. मयत रिक्षाचालकाच्या खिशातील ५०० रुपये काढून मोबाइल लंपास. २६ मार्च रोजी इंगळे याचा उपचारादरम्यान मृत्यू. नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन येथील शर्मा वाडीमध्ये किशन शुक्ला (२५) या रिक्षाचालकाची हत्या. कुख्यात शिकलगार टोळीने चोरीच्या उद्देशाने केली हत्या.
३ मार्च : नालासोपाऱ्याच्या शिर्डी नगरमधील भीमनगर वसाहतीमध्ये वनिता मोरे या महिलेची पतीकडून हत्या.
२६ मार्च : आचोळे गावात रमेश राठोड (४६) याची काही जणांनी लाकडी बांबूने बेदम मारहाण करून हत्या केली होती. ५ जणांना अटक
२९ मार्च : श्रीराम नगर येथे एका सुटकेसमध्ये २० ते २५ वयोगटातील तरुणीचा मृतदेह आढळला. हत्या करून तिचा मृतदेह काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये ठेवण्यात आला होता. यातील तरुणीची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही.
२८ मार्चला : होळीच्या दिवशी रात्री एका बारमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या दिलीप जेठवा या तरुणाची हत्या.
