Thane Crime News ठाणे -दुरुस्तीसाठी दिलेला मोबाईल फोन फॉरमॅट झाल्यामुळे एका पोलिस कर्मचाऱ्याचे आणि त्याच्या पत्नीचे वाद झाले. या वादातून पोलिस कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे.
वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात ५० वर्षीय पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. या पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा मोबाईल फोन रविवारी बंद पडला होता. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याने मोबाईल दुरुस्तीसाठी दुकानात नेला होता. मोबाईल दुरुस्त करुन झाल्यानंतर पोलिस कर्मचारी मोबाईल पुन्हा घरी आणला आणि पत्नीकडे दिला. पत्नीने मोबाईल फोन उघडताच तिच्या लक्षात आले की, दुरुस्ती दरम्यान तिच्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट झाला आहे.
याप्रकारामुळे पत्नी नाराज झाली आणि त्या दोघांमध्ये वाद झाला. तो वाद विकोपाला गेल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याने मानसिक तणावाखाली येत रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घरात असलेले लादी पुसण्याचे फिनाईल प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी स्वतःच दुचाकी घेऊन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. घडलेली घटना त्यांनी डॉक्टरांना सांगितली. त्यानंतर तत्काळ डॉक्टरांनी त्याला तपासून उपचाराकरता दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्याशी संपर्क साधला असता, याघटनेबाबत त्यांनी दुजारो दिला आहे.