कल्याण – पाऊस सुरू झाल्यामुळे पावसाचा आनंंद लुटण्यासाठी कल्याण पूर्वेतील मोकळ्या मैदानात, झाडाझुडपांचा आधार घेऊन सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करणाऱ्या, दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या, शांंततेच्या भंग करणाऱ्या ४४ टवाळखोर तरूणांंवर कोळसेवाडी पोलिसांनी रविवारी रात्री कारवाई केली.

या टवाळखोर तरूणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा, दारूबंदी कायद्याने कोळसेवाडी पोलिसांनी कारवाई केली आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे कल्याण पूर्वेतील अनेक तरूण दारूच्या बाटल्या घेऊन सार्वजनिक ठिकाणची मैदाने, उद्याने, बगिचे, झाडझुडपांचा आधार घेऊन दारू पीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.

सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन कोणीही गोंधळ घालत असेल, शांततेचा भंग आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांचे आदेश आहेत. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली चार ते पाच पोलीस पथकांनी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, काटेमानिवली, विजयनगर, चिंचपाडा परिसरात रविवारी रात्री शोध मोहीम हाती घेऊन सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बसलेल्या, दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा करणाऱ्या, झाडाझुडपांचा आधार घेऊन काळोखामध्ये दारू पित बसलेल्या तरूणांच्या टोळक्यांना पोलिसांना ताब्यात घेतले.

पोलिसांना पाहताच या तरूणांनी सुरूवातीला पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखून धरले. या तरूणांना पोलीसांच्या वाहनातून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यामधील बहुतांशी तरूणांनी दारू प्यायली होती. असे पोलिसांच्या निदर्शनास आहे. या सर्व टवाळखोर तरूणांना कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनी त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा, दारूबंदी कायद्याने गुन्हे दाखल केले. पुन्हा अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणार नाही अशी हमी लिहून घेतली आहे. या कारवाईने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या मद्यपी तरुणांचा पादचाऱ्यांना विशेषता महिला वर्गाला सर्वाधिक उपद्रव होत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या पाच महिन्यापू्र्वी उपायुक्त झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्व भागातून दररोज १५ ते २० मद्यपींना पकडून आणून पोलीस ठाण्यात प्रसाद दिला जात होता. तेव्हापासून कल्याण पूर्वेतील सार्वजनिक ठिकाणचे दारू अड्डे बंद झाले होते. ते पाऊस सुरू झाल्यानंतर पुन्हा सुरू झाल्याचे निदर्शनास आल्याने कोळसेवाडी पोलिसांनी या टवाळखोरांवर कारवाई केली आहे.