लहान मुले, पक्ष्यांसाठी धोकादायक; विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा
पतंग उडविण्यासाठी चिनी माजांचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने बंदी असलेल्या या मांजाच्या विक्रीवर पोलिसांची नजर असणार आहे. या मांजाच्या विक्रीवर बंदी घातली असली तरी अनेक दुकानांमध्ये त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असल्याने अशा विक्रेत्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
विविध भारतीय सणांवर आणि बाजारपेठांवर चिनी उत्पादकांनी अतिक्रमण केले आहे. चिनी मांजा त्यातीेलच एक आहे. चिनी मांजा धोकादायक असल्याने तो पक्ष्यांसाठी तसेच माणसांसाठी घातक ठरत आहे. हा चिनी मांजा अतिशय धारदार असल्याने पक्षी गतप्राण होतात आणि मनुष्यालाही इजा होते. परंतु टिकावू, स्वस्त तसेच पेच कापण्यासाठी उपयोग होत असल्याने चिनी मांजा लोकप्रिय झाला होता. या मांजाच्या दुष्परिणामामुळे प्राणीमित्र संघटनांच्या आक्षेपानंतर त्यावर बंदी घालण्यात आली होती. चीनी मांजाचा साठा करणे, वितरण करणे आणि वापरावरही बंदी घातली आहे. परंतु शहरात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने चिनी मांजा विकला जात आहे. पोलिसांनी शहरातील सर्व पतंग विक्रेत्यांच्या दुकानात जाऊन चिनी मांजा आहे की नाही त्याची तपासणी सुरू केलेली आहे. पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी पंधरा दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आपापल्या हद्दीत चिनी मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अनेक दुकानात जाऊन चिनी मांजाची विक्री होते की नाही त्याची खातरजमा केली आहे. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना चिनी मांजावर लक्ष ठेवण्यास सांगितलेले आहे. चिनी मांजाची विक्री करत असताना कुणी आढळल्यास त्याच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई केलीे जाईल.
– प्रकाश बिराजदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माणिकपूर

चिनी मांजा म्हणजे?
भारतीय मांजा लडी किंवा साखळीच्या स्वरूपातीला कापसाच्या धाग्यापासून बनवला जातो. काचेचा कूट, डिंक किंवा साबुदाण्याच्या खळात मिसळून बनवला जातो. या मांजाला धार नसते, तशी मजबूतही नसते. तो लवकर तुटतो तसेच जास्त वेळ ठेवल्याने खराब होतो. चिनी मांजा हा कृत्रिम धाग्याचा असतो. तो नायलॉनच्या धाग्यापासून तयार केला जातो. त्यावर खळीऐवजी अ‍ॅल्युमिनियम आणि लोखंडाची भुकटी विशिष्ट रसायनामध्ये कालवून लावली जाते. त्यामुळे या मांजाला धार येते.