ठाणे : राज्य सरकारने बुधवारी रात्री आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली आणि बढतीचे आदेश काढले. त्यानुसार, ठाणे पोलीस दलात आता मोठे फेरबदल झालेले आहेत. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले आणि पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचाही सामावेश आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना ठाणे पोलीस दलात अपर पोलीस आयुक्त म्हणून बढती मिळाली आहे.

काही महिन्यांपूर्वीच या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदली आणि बढतीला स्थगिती देण्यात आली होती. त्यावेळी त्यांची बढती पोलीस दलातील मलईदार नसलेल्या विभागात झाली होती. त्यामुळे या बदल्यांना राजकीय हस्तक्षेपामुळे स्थगिती मिळाल्याची चर्चा सुरू झाली होती. दोन महिन्यांतच या दोन्ही अधिकाऱ्यांना ठाण्यात अपर पोलीस आयुक्त म्हणून बढती आणि बदली मिळाल्याने पोलीस दलात चर्चांना उधाण आले आहे.

राज्य सरकराने बुधवारी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. यामध्ये ठाण्यातील दलातील अधिकाऱ्यांचाही सामावेश आहे. ठाण्याचे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त अनिल कुभांरे यांची मुंबईच्या संरक्षण व सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांना बढती देण्यात आली असून त्यांची नेमणूक आता पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. महामार्ग अधीक्षक संजय जाधव यांना पदोन्नती मिळून त्यांची बदली अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) म्हणून करण्यात आली आहे. तर वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांची बदली पालघरचे अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. तसेच पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची पूर्व प्रादेशिक विभागात अपर पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली आहे.

पंजाबराव उगले आणि दत्तात्रय शिंदे यांची एप्रिल महिन्यामध्ये बढती देऊन बदली करण्यात आली होती. उगले यांची सशस्त्र पोलीस दलात तर, दत्तात्रय शिंदे यांची संरक्षण व सुरक्षा विभागात बदली झाली होती. परंतु अचानक दुसऱ्याच दिवशी त्यांची बदली स्थगित करण्यात आली होती. हे दोन्ही विभाग मलईदार मानले जात नाहीत. त्यामुळे राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांची बढती आणि बदली स्थगित करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.