भाजप, मनसेचे सहकार्य; लोकसहभागातून निधी संकलित करण्याची संयोजकांची भूमिका  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवलीत भरणाऱ्या आगामी साहित्य संमेलनासाठी लागणारा निधी लोकसहभागातून संकलित करण्याचा संकल्प संयोजकांनी केला आहे. मात्र  संमेलनासाठी लागणारा खर्च अंदाजानुसार पाच कोटी रुपये  असून तो लोकसहभागातून संकलित करणे कठीम असल्याने त्यासाठी राजकीय व्यक्तींचे सहकार्य घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी संमेलनासाठी निधी मिळवून देण्याचे नियोजन बैठकीत घोषित केले आहे. या संमेलनावर राजकीय प्रभाव राहण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

९० वे अखिल भारतीय साहित्य संमेलन डोंबिवली शहरात होत आहे. त्यानिमित्ताने संमेलनाची रूपरेषा कशी असावी, त्याचे नियोजन, काय कल्पना राबविण्यात यावी आदी गोष्टींची चर्चा करण्यासाठी आगरी युथ फोरमच्या संयोजन समितीच्या वतीने रविवारी सर्वेश सभागृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कल्याण, डोंबिवली, शहापूर, कल्याण ग्रामीण आदी भागांतील साहित्य कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संमेलन म्हटले की त्याला कधी कधी राजकीय रंग चढतो, परंतु या संमेलनात तसे होता कामा नये. ठाणे महापालिका निवडणूक तोंडावर असल्याने अशा स्वरूपाची अनेक प्रलोभने संयोजन समितीच्या समोर येतील, परंतु त्यांनी राजकीय धनदांडग्यांचा वाव न देता लोकसहभागातून निधी जमवावा. कल्याण-डोंबिवलीकर नक्कीच त्यांना सढळ हस्ते मदत करतील. कलावंत मंडळी कधीही पैशाकडे पाहत नाहीत. त्यामुळे त्यांची ऊठबस करण्यासाठी फारसा निधी हवा, हा गैरसमज असून तो मनातून काढमून टाकावा. तसेच या संमेलनाचे संयोजन आगरी युथ फोरमकडे असल्याने ते एखादी जात अथवा समजाचे होता कामा नये. या मानसिकतेतून आपण बाहेर पडून एखादी वेगळी वाट चोखाळावी, अशा सूचना ज्येष्ठ साहित्यिकांनी या वेळी केल्या.

साहित्याकडे तरुणांचा ओढा वाढविण्यासाठी काही तरी वेगळे उपक्रम राबविले गेले पाहिजेत. तसेच बालकांनाही साहित्याची ओळख व्हावी म्हणून बालसंमेलनही झाले पाहिजे. साहित्यावर आधारीत चित्रपटही यात दाखविता येतील. शहरातील सार्वजनिक वाचनालयामध्ये साहित्य संमेलनासाठी निधी गोळा करता यावा म्हणून नोंदणीपुस्तिका ठेवावी. तसेच शहरातील नामंवत साहित्यिक पु.भा.भावे, शं.ना.नवरे, आचार्य अत्रे यांचे साहित्य समेलनात मांडावे. त्यांचे नाव संमेलनस्थळ तसेच व्यासपीठांना  देण्यात यावे अशाही सूचना काहींनी केल्या.

बोधचिन्हाची स्पर्धा

साहित्य संमेलनासाठी आकर्षक असे बोधचिन्ह तयार करायचे आहे. हे बोधचिन्ह केवळ डोंबिवली शहराचे नाही तर ठाणे जिल्हय़ाच्या जडणघडणीचा पाया असेल. अशा स्वरूपाचे बोधचिन्ह तरुणांनी येत्या आठवडय़ाभरात तयार करून समितीपुढे सादर करावे. आकर्षक बोधचिन्ह तयार करणाऱ्यास दहा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनामध्ये बोधचिन्हाचे अनावरण राज्यपालांच्या हस्ते झाले होते. यंदाच्या संमेलनातही मान्यवरांच्या हस्ते या चिन्हाचे अनावरण करण्यात येईल, सर्वाना ते आवडेल अशा स्वरूपाचे हे चिन्ह असावे असे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी या वेळी सांगितले.

प्रभावासाठी राजकीय चढाओढ

बैठकीच्या सुरुवातीला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी संमेलनासाठी निधी उभारणे हे समितीसमोर मोठे आव्हान आहे, असे सांगितले. कल्याण-डोंबिवली महापालिका आणि शासन संमेलनासाठी मदत करणार आहे. याबरोबरच जिल्ह्य़ातील इतर महापालिकांकडूनही मदत मिळविण्याचा आपण प्रयत्न करूअसेही ते म्हणाले. मात्र त्याचबरोबर मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी समोर येऊन संमेलनासाठी लागणाऱ्या निधीची मदत हे मनसेचे राजू पाटील करण्यास तयार असल्याची घोषणा बैठकीत केली. त्यामुळे संमेलनावर आपला प्रभाव टाकण्यासाठी भाजप आणि मनसेमध्ये चढाओढ दिसून आली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political issue in sahitya sammelan
First published on: 11-10-2016 at 01:30 IST