ठाणे – नागरिकांना खुल्या हवेत व्यायाम करता यावा यासाठी ठाणे महापालिकेने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोठा गाजावाजा करत सुरु केलेल्या व्यायामशाळांची दुरावस्था झाली असून सकाळ सायंकाळी याठिकाणी मोठी गर्दी करणाऱ्या ठाणेकरांचा यामुळे हिरमोड होऊ लागला आहे. शहरातील पदपथ, हरित पथ तसेच मोक्याच्या ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या यापैकी बहुसंख्य व्यायामशाळांमधील साहित्याची मोडतोड तर काही ठिकाणी ते चोरीला गेल्याने या संकल्पनेच्या मुळ उद्देशालाच तडा बसला आहे.
ठाणे महापालिकेने तीन हात नाका, लुईसवाडी भागात हरित जनपथ, कचराळी तलाव, मानपाडा येथील यू आर सिटी कार्यालय परिसर, वृंदावन, कळवा येथील नक्षत्र उद्यान, मुंब्रा येथील अग्निशमन दल कार्यालयाजवळ तसेच शहरातील अंतर्गत भागात लोकमान्य नगर, यशोधन नगर, ज्ञानेश्वर नगर, शास्त्रीनगर, वर्तकनगर, विवियाना मॉल जवळ अशा विविध ठिकाणी खुल्या व्यायामशाळा उभारल्या आहेत. या व्यायामशाळांच्या उभारणीसाठी आतापर्यत कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या व्यायामशाळांमध्ये सायकलिंग, एअर वाॅकर्स, रोईंग, चेस्ट प्रेस यासारख्या व्यायाम साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. या साहित्याच्या साहाय्याने सर्व प्रकारचे व्यायाम करणे शक्य होते. ठाणे शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या या खुल्या व्यायामशाळा सुरुवातीच्या काळात नागरिकांच्या पसंतीस उतरत होत्या. याठिकाणी सकाळ-सायंकाळ व्यायामासाठी नागरिकांची गर्दी दिसायची. गेल्या काही काळापासून नेमके उलट चित्र दिसत असून येथील साहित्याची झालेली दुरावस्था हे या मागील एक महत्त्वाचे कारण ठरले आहे.
याठिकाणी झाली दुरावस्था
वागळे इस्टेट भागातील लोकमान्य नगर परिसरात असलेल्या साने गुरुजी मार्गावर खुली व्यायामशाळा सुरु करण्यात आली होती. या व्यायामशाळेची अवस्था सध्या अतिशय बिकट झाली आहे. येथील साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहे. या साहित्यावर धुळ बसली आहे. साहित्य तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे या खुल्या व्यायामशाळेचा वापर करता येत नसल्याची खंत काही नागरिकांनी व्यक्त केली. यशोधन नगर, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस सर्व्हीस रोड, वर्तकनगर, शास्त्रीनगर या भागातील खुल्या व्यायामशाळांची अवस्थाही काही वेगळी नाही. ज्ञानेश्वर नगर भागात रस्त्याच्या कडेला पदपथावर अशाच पद्धतीची व्यवस्था उभी करण्यात आली होती. याठिकाणी असलेले व्यायामाचे साहित्य नाहीसे झाले आहे. ते चोरीला गेल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून केल्या जात असल्या तरी महापालिकेचा संबंधित विभाग या तक्रारींकडे ढुंकूनही पहायला तयार नाही.
ज्यावेळी ही खुली व्यायामशाळा सुरु करण्यात आली. तेव्हा दररोज याठिकाणी व्यायाम करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी होती. सर्वजण या व्यायामशाळेचा वापर करत होते. नागरिकांच्या आरोग्यासाठी खुली व्यायामशााळा ही संकल्पना उपयुक्त आहे. परंतु या व्यायामशाळांकडे आणि तेथील साहित्याच्या देखभालीकडे नंतरच्या काळात ढुंकूनही पाहिले जात नाही, अशी प्रतिक्रिया लोकमान्यनगर भागातील रहिवाशी प्रीतम शेवाळे यांनी दिली.
ज्या ठिकाणी खुल्या व्यायामशाळांची दुरावस्था झाली आहे तेथील पहाणी करुन तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. यासंबंधी लवकरच पहाणी तसेच सर्वेक्षण केले जाणार आहे. – वरिष्ठ अधिकारी, बांधकाम विभाग ठाणे महापालिका