डोंबिवली- ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानका जवळील वर्दळीच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यात हनुमान मंदिरा जवळील रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने या रस्त्याला कोंडीचा विळखा बसला आहे. या कोंडीचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असल्याने पालक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

डोंबिवली एमआयडीसी, चोळेगाव, ९० फुटी रस्ता, खंबाळपाडा परिसरातील नोकरदार, व्यावसायिक मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यासाठी ठाकुर्ली रेल्वे स्थानकात येतो. चोळेगाव, ९० फुटी रस्त्यावरून हा वर्ग खासगी वाहने, रिक्षांनी प्रवास करून रेल्वे स्थानक गाठतो. ठाकुर्ली रेल्वे स्थानक, हनुमान मंदिर, चोळेगाव गाव, मंगल कलश सोसायटी ते बंदिश पॅलेस हाॅटेल रस्त्यांवर खड्डे पडल्याने या रस्त्याची चाळण झाली आहे. कसरत करत रिक्षा चालक मुश्किलने प्रवासी वाहतूक करतात. कामावर जाण्याची आणि वेळेत लोकल पकडण्याच्या घाईत असलेले प्रवासी या खड्ड्यांमुळे हैराण आहेत. ठाकुर्लीतील महिला समिती शाळेत डोंबिवली, ९० फुटी रस्ता, एमआयडीसी भागातून विद्यार्थी शालेय बसने येतात. काही रिक्षा, खासगी वाहने येतात. त्यांना या रस्त्यावरील कोंडी, खड्ड्यांचा फटका बसतो.

डोंबिवलीतून कल्याणला जाण्याचा १० मिनिटाचा मधला मार्ग म्हणून सर्व प्रकारचे वाहन चालक ठाकुर्ली ९० फुटी रस्त्याला पसंती देतात. ही वाहने ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानका जवळून अरुंद रस्त्यावरील हनुमान मंदिरा जवळून म्हसोबा चौक ते ९० फुटी रस्त्याने पत्रीपुलाकडे जातात. कल्याणहून डोंबिवलीत येणारी वाहने याच रस्त्याने येतात. चोळेगाव, ९० फुटी रस्ता आणि डोंबिवलीतील वाहने एकाच वेळी ठाकुर्लीतील हनुमान मंदिरा जवळील ५० फुटाच्या अरुंद रस्त्यावर एकत्र येतात. या भागात खड्डे आणि त्यात अरुंद रस्ता. ही सर्व वाहने या कोंडीत अडकून पडतात. या अरुंद रस्त्याच्या दुतर्फा दुकाने आहेत. या दुकानामध्ये खरेदीसाठी आलेला ग्राहक आपले दुचाकी वाहन रस्त्यावर उभे करतो. ते वाहतुकीला अडथळे ठरते. याठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने कोणी वाहन चालक माघार घेण्यास तयार नसल्याने सर्वच वाहने या भागात कोंडीत अडकून पडतात. असे दररोजचे या भागातील चित्र असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जातात.

गेल्या महिनभरातील मुसळधार पावसाने ठाकुर्ली, चोळेगाव रस्त्याची चाळण झाली आहे. पालिकेकडून या भागातील रस्ते खड्डे खडी टाकून बुजविण्याचा प्रयत्न झाला. सततच्या वाहन वर्दळीमुळे खडी रस्त्यावर आली आहे. या भागात कायमस्वरुपी दोन वाहतूक सेवक वाहतूक विभागाने उभे करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, ठाकुर्लीतील रस्ता अरुंद आहे. या भागात खड्डे पडले आहेत. वाहतुक संथगतीने सुरू असल्याने कोंडीचा प्रश्न या भागात निर्माण झाला आहे. याठिकाणी आम्ही वाहतूक पोलीस तैनात केले होते. खड्डे ही या भागातील समस्या असल्याने वाहतूक पोलीस अशावेळी तेथे काही करू शकत नाहीत. या भागातील माजी नगरसेवक श्रीकर चौधरी यांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते विजय चौधरी, अजय चौधरी, संजय जोशी वाहन कोंडी झाली की स्वतःहून पुढे येऊन ते सोडवून वाहन चालकांना मार्ग मोकळा करून देतात.पालिका अभियंत्यांनी आम्ही खड्डे भरण्याची कामे प्रभागवार सुरू केली आहेत. खड्डे भरताना पाऊस पडत असल्याने कामास विलंब होत आहे असे सांगितले.