कल्याण : मागील पाच दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. पालिका प्रशासनाने खड्ड्यांचे आकार मोठे होण्यापूर्वीच या रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. पालिका हद्दीतील काही रस्ते सिमेंट काँक्रीटचे असले तरी काही रस्ते अद्याप डांबराचे आहेत. या डांबरी रस्त्यांवर एप्रिल, मे महिन्यात पालिकेच्या ठेकेदारांनी डांबरीकरण करून, खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत केले आहेत.

सततच्या वाहनांच्या वर्दळींमुळे आणि संततधार पावसामुळे या डांबरी रस्त्यांवरील डांबराचा थर निघून गेला आहे. अनेक ठिकाणी या रस्त्यांवरील लहान आकाराचे खड्डे वाहने सतत या खड्ड्यात आपटून मोठे होण्यास सुरुवात झाली आहे. डांबरी रस्त्यावरील वरचा थर निघून गेल्याने तेथे निसरडे रस्ते तयार झाले आहेत. या निसरड्यावरून दुचाकी स्वारांची वाहने घसरत आहेत. काही ठिकाणी रस्त्यावरील डांबराचा थर निघाल्याने तेथे बारीक खडी रस्त्यावर पसरली आहे. ही लहान खडी पादचाऱ्यांना आणि दुचाकी स्वारांना त्रासदायक ठरत आहे. कल्याण पूर्वेतील पुणे जोड रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकातील जवळील हनुमान मंदिर चोळेगाव तिठ्यावरील रस्ता खराब होण्यास सुरूवात झाली आहे. डोंबिवली पूर्व, पश्चिमेतील डांबरांच्या रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत उघड्यावरील दारूच्या दुकानांनी रहिवासी हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्त्यांवर खड्डे पडल्यास पावसाचा अंदाज घेऊन तात्काळ खडी मिश्रित काँक्रीट किंवा खडी मिश्रित डांबराने खड्डे भरण्याच्या सूचना संबंधित रस्त्याच्या नियंत्रक असलेल्या ठेकेदारांना केल्या आहेत. या प्रकरणात हयगय करणाऱ्या ठेकेदारांंवर कारवाई केली जाईल.

अनिता परदेशी (शहर अभियंता, कडोंमपा)