माजिवडा, मुंब्य्रात खड्डे कायम

मुसळधार पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

मुसळधार पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

ठाण्यात रस्त्यांवर अद्याप तीनशे खड्डे; पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचा सुस्त कारभार

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गेल्या आठवडय़ातील ठाणे शहर दौऱ्यापूर्वी तत्परतेने हालचाली करून रस्त्यांवरील खड्डे बुजवणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या कामाची गती आठवडाभरात मंदावली आहे. गेल्या दोन आठवडय़ांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. पालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात अद्याप २७७ ठिकाणचे खड्डे कायम असून माजिवडा, मुंब्रा परिसरांतील खड्डे अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत. गणेशोत्सवाला आता १५ दिवस उरलेले असताना रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य कायम असल्याबद्दल नागरिकांत तीव्र नाराजी आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही शहरातील खड्डे बुजविण्याची कामे सुरू झाली नव्हती. त्यामुळे खड्डय़ांमधून प्रवास करावा लागत असल्याने तो ठाणेकरांना नकोसा वाटू लागला होता.  असे असतानाच गेल्या आठवडय़ात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या दोन दिवस आधी शहरात खड्डे तातडीने बुजविण्याची मोहीम पालिकेने सुरू केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, उद्धव यांच्या दौऱ्यामुळे का होईना शहरातील रस्ते खड्डेमुक्त होण्याची चिन्हे होती. मात्र, आठवडा उलटूनही प्रत्यक्षात मात्र शहर खड्डेमुक्त झालेले नसल्याची बाब समोर आली आहे.

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरातील ६६२ खड्डे बुजविण्यात आले असून उर्वरित २७७ खड्डे भरण्याचे काम बाकी होते, असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू होऊन आठ दिवसांचा काळ लोटला असला तरी शहरामध्ये अजूनही २७७ खड्डे असल्याची बाब समोर आली आहे. ४७४ चौरस मीटर क्षेत्रफळावर हे खड्डे आहेत. माजिवडा प्रभाग समिती क्षेत्रात ९२ असे सर्वाधिक खड्डे असून त्यापाठोपाठ मुंब्य्रात ४३ खड्डय़ांची नोंद आहे. हे खड्डे कधी बुजविले जाणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Potholes in majiwada and mumbra

ताज्या बातम्या