नेमिचि येतो पावसाळा, त्याच प्रमाणे नेमिचि पडतात खड्डे असे समीकरण झाले आहे. शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी पडलेले हे सर्वसामान्य ठाणेकरांच्या नजरेतून चुकत नाही. मात्र पालिकेच्या नजरेतून ते कसे काय चुकतात याचे आश्चर्य नागरिकांना वाटत आहे. जागोजागी पडलेल्या खड्डे चुकवत प्रवास करताना प्रवाशांचा वेळ तर वाया जातोच आहे, शिवाय आपण पालिकेला कर का भरतो? असा प्रश्न मनात येत आहे, असे म्हटले तर ते वावगे होणार नाही.

शहरात पडलेले खड्डे हे जेटपॅचिंग या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बुजवावेत असे आदेश प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिले आहेत, त्या दृष्टीने कामेही चालू असलेली दिसतात. मात्र ती वरवरची मलमपट्टी फोल ठरत आहे.

ज्या ठिकाणी खड्डे भरले गेले त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडलेले पाहावयास मिळतात. काही ठिकाणी तर खड्डयावर चक्क पेव्हरब्लॉकचा उतारा केलेला दिसतो. मात्र हे पेव्हरब्लॉक वाहनचालकांसाठी धोक्याचे ठरत आहे. कळवा ब्रिज, टेंभीनाका या ठिकाणी पडलेल्या खडय़ांवर टाकण्यात आलेले पेव्हरब्लॉक आणि रस्ता हे असमांतर असल्यामुळे दुचाकी वाहनांना याचा जास्त त्रास होत आहे. त्यामुळे एखादा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल पडल्यावाचून राहत नाही.

रस्त्याची कामे होत असताना त्याचा दर्जा कशा प्रकारचा आहे, तो रस्ता किती काळ टिकेल याची तपासणी प्रशासनाकडून केली जाते का? रस्त्याचे काम करताना कोणते तंत्र वापरले जाते याचा विचारच केला जात नाही. उलट अनेक ठिकाणी चांगले असलेले रस्ते या ना त्या कारणांसाठी उखडले जातात व त्याची कामे केली जातात. दरवर्षी पडणारे खड्डे हा महापालिकेच्या सभागृहात नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र त्यावर कायमस्वरूपी असा ठोस उपाय कोणता करता येईल यावर चर्चाच होत नाही. अधिक काळपर्यंत टिकणारे रस्ते केले पाहिजेत यावर जर गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.

कापूरबावडी जंक्शन, मानपाडा, तीनहातनाका, कळवा पूल, कळवा नाका, सॅटीस कॅडबरी सिग्नल, नितिन कंपनी सिग्नल या परिसरात मोठया प्रमाणावर खड्डे पडलेले दिसून येतात. काही वर्षांपूर्वी कळव्यात खड्डयांमुळेच दोन भावांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर कळवा नाका येथे कळव्यातील प्रसिद्ध शिक्षक रवींद्र नेने यांनाही खड्डयांमुळेच आपला जीव गमवावा लागला होता. कळवा पारसिक परिसरात मोठय़ा प्रमाणावर नागरीकरण वाढले आहे.

त्यामुळे वाहनांची तसेच वाहनचालकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे कळवा पुलावरून ठाणे शहरात येण्यासाठी दररोज

मोठय़ा प्रमाणावर वर्दळ असते. कळवा पुलावरून जाणारी अवजड वाहने यामुळे या पुलावरदेखील खड्डे पडले असून ते पेव्हरब्लॉकने भरण्यात आले आहे. हे पेव्हरब्लॉक काढून हे खड्डे भरावेत अशी दुचाकी स्वारांची मागणी आहे. आयुक्तांना खड्डे बुजविण्याचा सज्जड दम अधिकाऱ्यांना दिला त्याप्रमाणे खड्डेही भरले गेले मात्र ते कोणत्या पद्धतीने भरले गेले याची पाहणी केली नसल्याचे दिसून येते. ठाणे महानगरपालिकेत उपमहापौर आणि सभागृहनेता ही पदे भूषविणारे सन्माननीय सदस्य हे कळवा खारीगांव परिसरातीलच आहेत. ते दररोज याच रस्त्याने पालिकेत येत असतील तर त्यांना निश्चितच ही परिस्थिती नजरेस पडली असावी किंवा त्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी कळवा खारीगांववासीय करीत आहेत.