कल्याण : वीस दिवसापूर्वी घाईघाईने उद्घाटन करण्यात आलेल्या सर्वाधिक वर्दळीच्या कल्याण शिळ रस्त्यावरील काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलावर खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. या खड्ड्यांच्या विषयावरून मनसेचे नेते राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री नियंत्रक असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कारभाराला ट्वीवटरच्या माध्यमातून लक्ष्य केले आहे.
मागील सात वर्षापासून रखडलेला पलावा चौकाजवळील एक्सपेरिया माॅल शेजारील काटई निळजे रेल्वे उड्डाण पूल लवकरच सुरू होणार म्हणून प्रवासी आनंदात होते. पलावा चौक भागातून आपण लवकर समाधानाने प्रवास करणार असा विचार प्रवासी करत होते.पलावा चौकाजवळील काटई निळजे रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलाचे काम पूर्ण होत आहे याची चाहूल लागल्यावर कल्याण ग्रामीणचे शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांंनी वरिष्ठांच्या आदेशावरून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मदतीने या पुलाचे उद्गाटन केले. हे उद्घाटन करतोय हे कोणाला कळू नये म्हणून २७ गाव, डोंबिवली शहर परिसरातील शिवसैनिकांनी देसाई गाव येथे एका शिवसेना पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात जमण्याचे आदेश देण्यात आले. तेथे आमदार राजेश मोरे यांचा जनता दरबार होणार आहे असे कळविण्यात आले.
शिवसैनिक देसाई गाव येथे जमल्यानंतर तेथे त्यांना अचानक आपणास आता काटई निळजे रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलाचे उद्गाटन करायचे आहे हे सांगण्यात आले. या सगळ्या प्रकाराने शिवसैनिक, पदाधिकारी हैराण झाले. एवढ्या गोपनीय पध्दतीने या पुलाचे उदघाटन कशासाठी असे प्रश्न शिवसैनिक खासगीत उपस्थित करत होते. घाईत एका दुकानातून ४० नारळ आणण्यात आले. हातगाडीवरून हार खरेदी करण्यात आले. पुलाच्या बाजुला पडलेला एक सिमेंटचा ठोकळा नारळ फोडण्यासाठी पुलाच्या मुख्य पोहच मार्गिकेवर ठेऊन नारळ फोडण्यात आले.
आमदार मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि पदाधिकारी नारळ फोडण्यात दंग होते. उद्घाटनासाठी गोड पदार्थ म्हणून पेढे आणले नव्हते. ओढाताण करून रेटून केलेला हा कार्यक्रम असल्याने त्याची नड उड्डाण पुलाच्या मागे लागली. त्यामुळे उद्घाटनापासून पूल अनेक प्रकारे वादाच्या भोवऱ्यात अडकत चालला आहे, असे राजू पाटील यांनी सांगितले. गैरव्यवहार, निविदा, टक्केवारी यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काटई निळजे रेल्वे उड्डाण पूल आहे, असे पाटील सांगतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमएसआरडीसीचे मंत्री आहेत. त्यांच्या खात्याचा कारभार कसा चालला आहे. हे काटई पुलावरील खड्ड्याच्या माध्यमातून बघा, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
आमदार राजेश मोरे वेळोवेळी काटई पुलावर जाऊन पुलाचा पृष्ठभाग एकदम सुस्थितीत, गुळगुळीत असल्याचे सांगत आहेत. या पुलाचे काम योग्यरितीने झाले नसल्याने आता या पुलावर खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. दणके खात या पुलावरून प्रवास करावा लागत आहे, अशा तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. एका चांगल्या पुलाचे घाईच्या उद्घाटनाने वाट्टोळे केले असाही प्रवाशांचा संतप्त सूर आहे.