डोंबिवली पूर्वेतील सारस्वत कॉलनी , सावरकर रस्ता भागातील वीज पुरवठा गेल्या काही दिवसांपासून सतत खंडित होत असल्याने रहिवासी, घरून काम करणारे कर्मचारी, या भागातील आस्थापना चालक हैराण आहेत. शुक्रवारी सारस्वत कॉलनी भागाचा वीज पुरवठा सहा ते सात वेळा खंडित झाला, अशा तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या.
वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणच्या सेवासंपर्क क्रमांकावरून संपर्क साधल्यास तेथील कर्मचारी कोणताही प्रतिसाद देत नाहीत. यदाकदाचित कर्मचाऱ्याने फोन उचलल्यास रहिवाशांना बेशिस्तपणे उत्तरे दिली जातात. किंवा रहिवाशांचे म्हणणे ऐकून न घेता फोन ठेऊन दिला जातो, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या.
काही दिवसापूर्वी सावरकर रस्ता भागातील एका खासगी आस्थापनामधील एका उच्चपदस्थ सावरकर रोड भागात सातत्याने वीज पुरवठा का खंडित होतो म्हणून विचारणा करण्यासाठी डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौकातील महावितरण कार्यालयात गेले होते. या उच्चपदस्थाने महावितरणच्या कार्यालयात जाऊन तेथून सेवासंपर्क क्रमांकावर मुद्दाम संपर्क साधला. तेव्हा एका महिलेने फोन उचलला. सावरकर रोड विभागाची वीज का खंडित होते अशी विचारणा या उच्चपद्स्थाने केली. तेव्हा संबंधित महिलेने सावरकर रोड विभाग बाजी प्रभू चौकाच्या अंतर्गत येत नाही, असे बेजबाबदार उत्तर दिले. आपण महावितरणच्या बाजीप्रभू चौकातील कार्यालयातूनच तुमच्याशी संपर्क साधला आहे, असे उत्तर उच्चपदस्थानेच देताच, महावितरण कार्यालयातील संपर्क कक्षातील महिला कर्मचाऱ्याने फोन बंद केला. असे अनेक अनुभव सावरकर रोड, सारस्वत कॉलनी भागातील रहिवास घेत आहेत, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
सारस्वत कॉलनी भागातील वीज पुरवठा शुक्रवारी कोणतीही पूर्वसूचना न देता सहा वेळा खंडित करण्यात आला. रहिवाशांनी, या भागातील खासगी आस्थापना, व्यावसायिकांनी महावितरण कार्यालयात कार्यालयात संपर्क साधला. त्यावेळी त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही. उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. वीज पुर‌वठा खंडित झाल्यानंतर घरात असह्य उकडते. अनेक कर्मचाऱी घरातून काम करतात. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर त्यांना काम करणे अवघड होते. घरात रुग्ण, ज्येष्ठ, वृध्द, लहान बाळ असतात त्यांना वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर सर्वाधिक त्रास होतो, असे रहिवाशांनी सांगितले.
महावितरणच्या पाल वीज पुरवठा केंद्रात बिघाड झाल्यामुळे या केंद्रावरून वीज पुरवठा होणाऱ्या भागाला त्याची झळ बसते असे उत्तर महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दिले. सारस्वत काॅलनी भागाचा वीज पुरवठा खंडित का होतो याची माहिती घेतो. आपण सुट्टीवर असल्याने तात्काळ माहिती देऊ शकत नाही, असे महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.