ठाणे : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात एवढी महागाई वाढली नव्हती. पेट्रोल आणि डिझेलचे दरही ८० रुपयांच्या वर गेले नव्हते. परंतु आजच्या घडीला महागाई बोकाळली असून यामुळेच हिंदू- मुस्लिम दंगली घडवल्या जात असल्याचा आमचा संशय आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केले. तसेच न्यायालयाने कामावर रुजू होण्याची एक संधी दिल्यामुळे उर्वरित प्रश्न नंतरही सोडवता येतील. त्यामुळे आपला गिरणी कामगार होण्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहनही त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना यावेळी केले.

ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात सोमवारी ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने राष्ट्रपिता ज्योतिराव फुले जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एसटी कामागरांचे या सरकारने शोषणच केले आहे. शरद पवार हे सत्तेत नसले तरी त्यांचा पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी याचा विचार करावा असा टोलाही त्यांनी लगावला. कोणाच्याही घरावर हल्ला करणे हे चुकीचेच असून त्याचा आम्ही निषेधच करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. एसटी कामगारांची न्यायालयात ज्या पद्धतीने बाजू मांडायला पाहिजे होती, त्या पद्धतीने बाजू मांडली गेली नाही. न्यायालयाने आता कामावर रुजू होण्याची एक संधी दिली असून यामुळे आपला गिरणी कामगार होण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवनेरी बसच्यामार्फत जेव्हा एसटीचे खाजगीकरण झाले, तेव्हाच हा लढा द्यायला हवा होता. तसेच संपाबाबत न्यायालयात योग्य बाजू मांडली गेली असती तर जितके अभय न्यायालयाने दिले आहे. त्यापेक्षा आणखी अभय मिळाले असते, असेही ते म्हणाले. वकिलांनी केवळ न्यायालयात आपली बाजू मांडायची असते. रस्त्यावर बाजू मांडायची नसते. नेते आणि वकील अशा दोन्ही भूमिका एकाच वेळी निभावता येत नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोंग्याच्या बाबतीत जे राजकारण सुरू आहे, त्यावर उद्या राज ठाकरे यांच्या सभेनंतरच उत्तर देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.