ठाणे – महिलांमधील कलागुणांना वाव मिळावा त्यांच्यातील ‘स्व’ चा शोध त्यांना घेता यावा, महिलांना एक दिवस पूर्ण स्वत:साठी देऊन आनंद, समाधान मिळावे यासाठी दरवर्षी ठाण्यातील प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीने ‘आम्ही साऱ्याजणी’ हा महिला महोत्सव आयोजित केला जातो. यंदा या महोत्सवाचे १३वे वर्षे आहे. या महोत्सवात समूह नृत्य, मंगळागौर, गीत गायन, चारोळी अशा विविध स्पर्धांसह आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांची विशेष मुलाखत या महोत्सवात पार पडणार आहे. हा महोत्सव शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता घोडबंदर येथील आय लीफ रीटज् बॅंक्वेट हॉल मध्ये होणार आहे.

ठाणे येथील प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच ज्येष्ठांसाठी व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी विविध कार्यक्रम होत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ते रात्री ८.३० वाजेपर्यंत डॉ. काशिनाथ घाणेकर लघु नाट्यगृहात या महोत्सवांतर्गत विविध स्पर्धा पार पडणार आहेत. तर, शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महिला महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्पर्धेतील विजेत्या महिलांचा बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय भारुडकार चंदाताई तिवाडी या लोककला सादर करणार आहेत. तर, आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांची विशेष मुलाखत डॉ. अरुंधती भालेराव घेणार आहेत. या महोत्सवाला सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि ज्येष्ठ समाजसेविका रेणू गावसकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या विनामूल्य कार्यक्रमाचा सगळ्यांनी आनंद घ्यावा असे आवाहन प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

महोत्सवा अंतर्गत या स्पर्धा रंगणार

गीत गायन, समूह भजन, मंगळागौर, समूह नृत्य, एकल नृत्य, चारोळी, उखाणे, सुविचार, फॅशन शो अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. गीत गायन, समूह नृत्य आणि एकल नृत्य ह्या तीन स्पर्धा १८ ते ३५ आणि ३६ व त्यापुढे अशा दोन वयोगटात विभागल्या आहेत.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान

सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. विजय सुरासे आणि डॉ. पल्लवी सुरासे (वैद्यकीय क्षेत्र), डॉ. विनय राऊत आणि डॉ. अनघा राऊत (शैक्षणिक क्षेत्र), रवि नवले आणि निशा नवले (कला क्षेत्र), प्रशांत काळुंद्रेकर आणि मेघना काळुंद्रेकर( संगीत क्षेत्र) असे चार विशेष सत्कार त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल केले जाणार आहेत.