ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आज दुपारी मुंबईत मंत्रीमंडळ बैठक होणार असून यामध्ये विविध निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये प्रताप सरनाईक यांना दिलासा देणारा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. कारण मंत्रीमंडळ बैठकीची सूचना व कार्यसूची याबाबतची माहिती देणारा एक फोटो वायरल झाला आहे.

या वायरल झालेल्या फोटोतील माहितीनुसार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डन इमारतीचा दंड आणि दंडावरील संपूर्ण व्याज हे पूर्णपणे माफ करत, इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्यासंदर्भात ठाणे महानगरपालिका आयुक्तांना आदेश देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेतला जाणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीत राज्याशी, राज्यातील जनतेशी संबंधित हिताचे मोठे निर्णय घेतले जात असतांना थेट एका व्यक्तिसाठी निर्णय तेही मंत्रीमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याची चर्चा रंगू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईडी चौकशीमुळे काही काळ प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहिलेल्या, काही माहिने चर्चेत नसलेल्या प्रताप सरनाईक यांना आता एका वेगळ्या निर्णयामार्फेत दिलासा तेही थेट मंत्रीमंडळ बैठकीतून दिला जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मध्यंतरी भाजपाशी जुळवून घेण्याची मागणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे करत सरनाईक यांनी खळबळ उडवून दिली होती. तेव्हा आता मंत्रीमंडळ बैठकीच्या माध्यमातून दिलासा देणारा निर्णय घेत आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमिवर सरनाईक यांच्यामागे पक्ष उभा असल्याचा संदेश दिला जात असल्याची चर्चा ठाण्यात सुरु झाली आहे.