ठाणे : रॅपिडो कंपनीच्या प्रायोजकत्वावरून विरोधी पक्षाने परिवहन मंत्री यांच्यावर टीका केल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी स्पष्टीकरण दिले. प्रायोजकत्व दिले म्हणजे, त्यांनी शासनाला विकत घेतले असे होत नाही. त्यांनी बेकायदेशीर कामे केली तर शासन त्यांच्यावर कारवाई करेल. बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना शासन पाठीशी घालणार नाही असे सरनाईक म्हणाले. मराठी गोविंदा जागतिक पातळीवर जात आहे, त्यामुळे तुम्ही विरोध करत आहात का असा प्रश्नही त्यांनी विरोधी पक्षाला उपस्थित केला.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत बेकायदेशीरित्या ‘रॅपिडो’ (बाइक टॅक्सी) धावत असल्याचे उघडकीस आणून गुन्हे दाखल केले होते. त्याच ‘रॅपिडो’चे प्रायोजकत्व प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक फाऊंडेशनने ‘प्रो गोविंदा लीग २०२५’ या खेळासाठी घेतले. त्यानंतर सरनाईक यांच्यावर विरोधी पक्षाने टीका केली होती. शुक्रवारी प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार रोहीत पवार आणि विजय वडेट्टीवार यांनी प्रायोजकत्वाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहेत. विरोधी पक्षांच्या सदस्य आरोप करत आहेत, त्यांचे ते कर्तव्य आहेत. आरोप केल्याशिवाय त्यांची दुकाने चालणार नाहीत. प्रो गोविंदा हा एक खेळ आहे आणि त्यात राजकारण आणू नये.
रोहीत पवार देखील क्रिकेट सामान्यांचे आयोजन पुण्यात करतात. खेळासाठी २० -२५ एजन्सी मागील तीन वर्षांपासून प्रो गोविंदाला, ज्याचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक आहेत, त्यांना प्रायोजकत्व देतात. प्रो गोविंदाला प्रायोजकत्व दिल्यानंतरही रॅपिडोने बेकायदेशीर कामे केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. प्रायोजकत्व दिले म्हणजे, त्यांनी शासनाला विकत घेतले असे होत नाही. त्यांनी चुकीची कामे केली तर शासन त्यांच्यावर कारवाई करेल. बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना शासन पाठीशी घालणार नाही असे सरनाईक म्हणाले.
मी तीन वर्षांपूर्वी परिवहन मंत्री नव्हतो. प्रो-गोविंदा तीन वर्षांपासून सुरू आहे. या खेळाला तीन वर्षांपासून २० ते २५ एजन्सी प्रायोजकत्व देत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा बाऊ करण्याची आवश्यकता विरोधी पक्षाला नव्हती. प्रो गोविंदासारखा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचत असले तर त्याला सहकार्य करायला हवे. आम्ही फक्त चालकावर नाही तर, संचालकांवरही कारवाई केली होती. वडेट्टीवार किंवा विरोधी पक्षाचे सदस्य आरोप करत आहेत, त्यांना आम्ही बळी पडणार नाही असेही ते म्हणाले.
ओला, उबर, रॅपिडो संदर्भा अनेक तक्रारी विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांनी केल्या होत्या. मागील तीन वर्षांपासून आम्हाला प्रायोजकत्व देत होते. परंतु मी स्वत: जाऊन त्यांना पकडून दिले आहे. त्यामुळे उलट विरोधी पक्षाने आमचे कौतुक करायला हवे होते. रॅपिडो, ओला, उबर यांना आम्ही परवानगी देण्यास तयार आहोत. त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून सेवा सुरु करण्यास सांगितले आहे, जेणेकरून राज्य सरकारला महसूल मिळेल. मराठी गोविंदा जागतिक पातळीवर जात आहे, त्यामुळे तुम्ही विरोध करत आहात का असा प्रश्नही त्यांनी विरोधी पक्षाला उपस्थित केला.