कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत पावसाळ्यापूर्वीची नाले, गटार सफाईची कामे सुरू करण्यात आली आहेत. गटार सफाईची कामे करताना बहुतांशी मजूर ठेकेदाराने दिलेले संरक्षित साहित्य न वापरता गटार सफाईची कामे जीव धोक्यात घालून करत आहेत. नागरिक या सगळ्या प्रकाराविषयी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

गटार सफाईची कामे करताना मजुरांनी हातमोजे, गमबुट, डोक्यावर शिरस्त्राण, चेहऱ्यावर संरक्षित पट्टी, कमरेला दोर बांधणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक मजूर गटार सफाईची कामे करताना संरक्षित साधनांचा वापर न करता गटारात उतरून गटार सफाईची कामे करत आहेत. गटारात विषारी वायू तयार झालेले असतात. गाळ आणि त्या गाळामध्ये विविध प्रकारचे जीव जंतू असतात. या सर्व घटकांचा मजुरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. गटारात उतरल्यानंतर गाळाने भरलेला हात अनेक वेळा मजूर आपल्या चेहऱ्याला लावतात. गटार साफ करताना या मजुरांना काही बाधा झाली की मग ठेकेदार आणि पालिकेची यंत्रणा खडबडून जागी होती.

यासंदर्भात ठेकेदार आणि जल, मलनिस्सारण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले, गटार सफाई करणाऱ्या मजुरांना सर्व प्रकारची संरक्षित साधने ठेकेदाराने दिली आहेत. त्यांनी त्या साधनांचा वापर करावा, अशा सक्त सूचना आहेत. पालिका प्रशासनाने ठेकेदाराला मजूर कामगारांची काळजी घेऊनच ही कामे करावीत अशा सूचना केल्या आहेत.

मजूर कामगारांनी सांगितले, हातमोजे, गमबुटाचा वापर करून आम्ही गटारात उतरलो तर गमबुटात गटारातील पाणी जाऊन पायांना, पायांच्या बोटांमध्ये चिखल्या (जखमा) होतात. हातमोजे घातले की काम कामाचा उरक करताना अडचणी येतात. हातमोजे गटारातील पाणी, गाळाने सारखे भरून जातात. काम करताना अडथळे येतात. गतीने
काम करण्यासाठी आम्ही या साधनांचा वापर करत नाहीत. गटार सफाईची कामे करताना आम्ही काळजी घेतो.

मजुरांचा तुटवडा

यापूर्वी डोंबिवलीतील नाक्यावर गटार सफाई कामासाठी सहजपणे ठेकेदाराला मजूर उपलब्ध होत होते. आता विविध शासकीय योजना, खासगी आस्थापनांमध्ये तरूणांना नोकऱ्या मिळत आहेत. त्यामुळे पूर्वीसारखा तरूण आणि ४० ते ५० वयोगटातील नागरिक गटार सफाई कामासाठी मिळत नाहीत. या मजुरांना वाढीव मजुरी देण्याचे आश्वासन देऊनही ते कामावर येण्यास तयार होत नाहीत, अशी माहिती काही कामगार ठेकेदारांनी दिली. ही कामे करण्यासाठी आदिवासी दुर्गम भागातील कसारा, खर्डी, शहापूर भागात जावे लागते. तेथील तरूणांना चांगल्या रोजगाराचे आश्वासन दिल्यावर ती गटार सफाईची कामे करण्यासाठी मिळतात, असे ठेकेदारांनी सांगितले.

गटार सफाईची कामे करणाऱ्या मजुरांना ठेकेदारांनी सर्व प्रकारचे संरक्षित साधने दिली आहेत. ही साधने वापरून गटार सफाई करताना मजुरांना अडचणी येतात म्हणून ते साधने वापरत नाहीत. ही साधने वापरूनच गटार सफाई करावी, अशा सूचना ठेकेदारांना केल्या आहेत.-घनश्याम नवांगुळ कार्यकारी अभियंता