ठाणे: आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बरोबर घेऊनच लढविणार आहोत. पण, राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे गटाशी युती करण्याबाबतचा निर्णय भाजपच्या स्थानिक पातळीवरील समितीशी चर्चेनंतरच घेण्यात येईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी ठाण्यात स्पष्ट केले.

बावनकुळे यांनी संघटनात्मक बांधणीसाठी शनिवारी ठाणे शहराचा दौरा केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रथमच त्यांनी महापालिका निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकांमध्ये युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवरील समिती घेते आणि त्याची माहिती प्रदेश स्तरावर कळवते. त्यानुसार प्रदेश पातळीवरून युतीबाबतचे निर्णय जाहीर केले जातात. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरील समितीच्या चर्चेनंतरच युतीचा निर्णय घेण्यात येणार आहे.’’

ठाणे महापालिका ‘स्मार्ट सिटी’ तसेच इतर घोटाळय़ांबाबत पक्षाच्या नेत्यांनी आवाज उठविल्यानंतर चौकशी सुरू झाली, हे खरे आहे. पण, राज्यात सत्तांतरानंतर त्या चौकश्यांची नस्ती अद्याप बंद झालेली नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. शिंदे-फडणवीस सरकार पडेल, अशी भाकीते राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. पण आपल्या पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाऊ नये म्हणून त्यांना अशी विधाने करावी लागत आहेत, असेही ते म्हणाले.

उद्धव यांच्या काळात नुकसान 

उद्योजकांना तीन ते चार तासांचा वेळ द्यावा लागतो. पण, मुख्यमंत्री असताना दोन वर्षांत उद्धव ठाकरे मंत्रालयात आलेच नाहीत. त्यामुळेच उद्योग राज्याबाहेर गेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शिंदे आणि फडणवीस सरकार चांगले काम करीत असून हे सरकार गेल्या अडीच वर्षांत झालेले नुकसान भरून काढेलच, पण त्याचबरोबर पुढील दोन वर्षांची विकासकामेही करेल. या सरकारला आम्ही संघटनेच्या माध्यमातून बळ देण्याचे काम करणार आहोत, असेही ते म्हणाले.

‘पक्षवाढीसाठी कुणालाही प्रवेश’

महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांना निवडणुकीत उमेदवार मिळणार नाहीत. त्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले. महाविकास आघाडीप्रमाणेच शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्ते पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना प्रवेश देणार का, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी पक्षवाढीसाठी कुणालाही प्रवेश देऊ, असे स्पष्ट केले.

‘उद्धव यांच्यावर राष्ट्रवादीचा जादुटोणा’

राष्ट्रवादी काँग्रेसने कपट कारस्थान करून उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला. त्यामुळे ठाकरे त्यांच्याबरोबर गेले. पण, राज्यात आता त्यांचा दिवा पेटणार नाही. शरद पवार यांच्या जाळय़ात उद्धव ठाकरे अडकल्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षातील आमदारांचा विचार केला नाही, विचारांनाही मूठमाती दिली. आपला पुत्र आणि आपण या मोहापायी ते महाविकास आघाडीत सामील झाले, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.

महापालिका निवडणुकांमध्ये युती करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक समिती घेते आणि त्याची माहिती प्रदेश स्तरावर कळवते. त्यानुसार प्रदेश पातळीवरून युतीबाबतचा निर्णय जाहीर केला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप