खेळाडूंवर रितसर बोली, यूटय़ूबवरून थेट प्रक्षेपण; ग्रामीण भागांतील तरुणांना कमाईचे नवे साधन

आशिष धनगर, नीलेश पानमंद

ठाणे : इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर स्थानिक पातळीवर क्रिकेट स्पर्धा भरवण्याच्या प्रकाराला आता व्यावसायिक स्वरूप मिळू लागले असून यातून ग्रामीण भागातील तरुण क्रिकेटपटूंना कमाईचे नवे दालन खुले झाले आहे. ठाणे, पालघर जिल्ह्य़ांच्या ग्रामीण पट्टय़ात ठिकठिकाणी चक्क स्थानिक खेळाडूंवर बोली लावून, संघखरेदी करून या स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक खेळाडूवर पाचशे ते १५ हजार रुपयांपर्यंत बोली लागत असून पंच, समालोचक अशी पूरक यंत्रणाही चांगले अर्थार्जन करत आहे. विशेष म्हणजे, यूटय़ूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करून त्याला प्रसिद्धीवलय देण्याचाही प्रयत्न होत आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात भातशेती होते. ऑक्टोबर महिन्यात भातकापणी झाल्यानंतर तरुणांना काहीच काम नसते. या काळात तरुणांकडून क्रिकेट तसेच अन्य मैदानी खेळ खेळून मनोरंजन केले जायचे. शेतावर क्रिकेट सामनेही खेळले जायचे. मात्र, केवळ मनोरंजनासाठी होत असलेल्या या सामन्यांचे स्वरूप आता बदलले आहे. आयपीएलच्या धर्तीवर हे सामने भरविण्याची परंपरा सुरू झाली आहे. वाढत्या नागरिकीकरणामुळे ग्रामीण भागातील जमिनींचे भाव वाढू लागले असून त्यातून अनेक ग्रामस्थांना चांगले पैसे मिळत आहेत. त्यापैकी अनेक राजकीय क्षेत्रातही नावारूपास आले आहेत. अशा पुढारी मंडळींकडून आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या क्रिकेट सामन्यांमध्ये संघ उतरविले जात असून त्यासाठी ही मंडळी उत्तम क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवर बोली लावून त्यांची खरेदी करत आहेत. पाचशे रुपयांपासून ते पंधरा हजार रुपयांपर्यंत ही बोली लावण्यात येते. त्यामुळे भातकापणीनंतरच्या फावल्या वेळेत होणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांचे अर्थार्जन होऊ लागले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण ग्रामीण, डोंबिवली ग्रामीण, भिवंडी, नवी मुंबई ग्रामीण, तर पालघर जिल्हय़ातील वसई, विरार, मनोर आणि वाडा या भागांमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. दर आठवडय़ाला शुक्रवार ते रविवार या कालावधीत या स्पर्धा भरविण्यात येतात.

अशा होतात स्पर्धा..

क्रिकेट सामन्यांसाठी खेळपट्टी, प्रेक्षक गॅलरी आणि खेळाडूंसाठी विश्रांती कक्ष तयार केला जातो. आयपीएल सामन्यांसारखीच संघनिवड केली जाते. स्पर्धेच्या आर्थिक नियोजनानुसार संघातील खेळाडूंच्या खरेदीचे आर्थिक नियोजन ठरविले जाते.

या स्पर्धेसाठी संघाचे मालक खेळाडूंना संघाची टी-शर्ट, ट्रॅक पॅण्ट आणि टोपी असे साहित्य पुरविते. त्यावर स्पर्धेचे, संघाचे आणि खेळाडूंची नावे असतात. या स्पर्धेत एक ते चार क्रमांक मिळविणाऱ्या संघातील खेळाडूंनाच पैसे दिले जातात. प्रत्येक संघमालक एक आयकॉन खेळाडू विकत घेतात. या खेळाडूचे दर इतर खेळाडूंपेक्षा अधिक असतात.

रोकड, कोंबडे, बकरे

या क्रिकेट स्पर्धासाठी ५० हजारांपासून ५ लाखांपर्यंत रोख बक्षिसे ठेवण्यात येतात. त्याचबरोबर कोंबडे आणि बकरेही बक्षिसे म्हणून ठेवण्यात येतात, तर सामनावीर आणि मालिकावीरांसाठी दुचाकी आणि सोनेचांदीची नाणी बक्षिसे म्हणून देण्यात येतात. तसेच या स्पर्धासाठी ग्रामीण भागातील तरुणाची हंगामी पंच आणि समालोचकांची नेमणूक केली जाते. या तरुणांना पाचशे ते पाच हजार रुपयांचे मानधन दिले जाते. या स्पर्धेत उत्तम खेळणाऱ्या खेळाडू, पंच आणि समालोचकांना ग्रामीण भागात प्रसिद्धीही मिळत असल्याचे खेळाडू शुभम घोष्टेकर याने सांगितले.

काही वर्षांपूर्वी आम्ही केवळ मनोरंजन म्हणून क्रिकेट खेळायचो; परंत गेल्या काही वर्षांत या स्पर्धाचे स्वरूप बदलले असून आता आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट सामने होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना चांगले पैसे मिळू लागले आहेत.

– निखिल वाकळे, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघटना