ठाणे : शिवसेनेच्या ठाण्यातील गेल्या तीन दशकातील सत्तेचा केंद्र बिंदू राहिलेल्या पाचपाखडी येथील महापालिका मुख्यालयात बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी ठाण्यातून मोठी गर्दी जमाविण्याचे लक्ष्य यावेळी उपस्थितांना ठरवून देण्यात आले. गेले अनेक वर्ष शिवाजी पार्क येथे होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करणाऱ्या ठाण्यातील शिंदे समर्थक नगरसेवकांना यंदा प्रथमच दसऱ्याला अन्य ठिकाणी गर्दीचे लोंढे न्यावे लागणार आहेत. शिवसेनेचे अनेक दशकापासून सत्ताकेंद्र राहिलेल्या महापालिका मुख्यालयात यासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीची जोरदार चर्चा आज ठाण्यातील राजकीय वर्तुळत होती.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यातील शासकीय बालगृह, निरीक्षण गृह आठ दिवसांपासून अंधारात ; शासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेतील बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातून मोठे समर्थन मिळत आहे. जिल्ह्याच्या शहरी भागातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक तसेच युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दर्शविला होता. त्याचबरोबर ठाणे महापालिकेवर गेली तीन दशके शिवसेनेची सत्ता राहीली असून सत्तेचा केंद्रबिंदू असलेल्या या पालिकेतील शिवसेनेच्या ६५ माजी नगरसेवकांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले होते. याच सर्व माजी नगरसेवकांची ठाणे महापालिका मुख्यालयात बुधवारी एक महत्वाची बैठक पार पडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीला शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच प्रत्येक प्रभागातून जास्तीत जास्त नागरिक मेळाव्यासाठी येतील, याचे नियोजन करावे. मेळाव्याकरिता येणाऱ्या नागरिकांकरिता वाहनांची व्यवस्था करण्यात येईल, अशी चर्चा बैठकीत झाली. खरी शिवसेना कुणाची आणि पक्ष चिन्ह कुणाला मिळणार यावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरु आहे. शिवसेनेकडून दरवर्षी शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. मात्र, खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा करत शिंदे यांनीही यंदा दसरा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे यापैकी कुणाच्या मेळाव्याला मोठी गर्दी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाने मेळाव्यासाठी जास्तीत जास्त गर्दी व्हावी यासाठी तयारी सुरु केली असून ठाकरे यांच्या मेळाव्याला टक्कर देण्यासाठी शिंदे गटानेही जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यासाठी ठाण्यात शिंदे यांच्या समर्थक नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली असून त्यात शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी ठाण्यातून मोठी गर्दी जमाविण्याचे लक्ष्य यावेळी उपस्थितांना ठरवून देण्यात आले आहे.