ठाणे : ठाणे शहरात गेले काही वर्षांपासून छटपूजेचे प्रस्थ वाढत आहे. शहरातील काही सामाजिक संस्थांसह महापालिका प्रशासनाकडून देखील आता छटपूजेची तयारी केली जात आहे. ठाणे शहरात वीस ठिकाणी छट पूजेसाठी सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सात ते आठ ठिकाणी महापालिकेच्या वतीने कृत्रीम तलाव तयार केले जाणार आहेत.
उत्तर भारतीयांचा छटपूजा हा मोठा सण असून यंदा हा सण २७ ऑक्टोबर आणि २८ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाणार आहे. दिवाळी झाली की, उत्तर भारतीयांना छटपूजेचे वेध लागतात. गेल्या काही वर्षात मुंबईसह ठाणे शहरातही उत्तर भारतीयांची संख्या वाढली असून छट पूजेचे प्रस्थही वाढले आहे. ठाणे शहरात उपवन तलाव आणि रायलादेवी तलाव याठिकाणी मोठ्याप्रमाणात छटपूजा साजरी केली जात होती.
कालांतराने उत्तर भारतीयांची वाढती लोकसंख्या छट पूजेचे प्रस्थ पाहता महापालिका यामध्ये विशेष लक्ष घालत आहे. यंदा ठाणे शहरात वीस ठिकाणी छटपूजेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये उपवन येथे रुद्र प्रतिष्ठान आणि महापालिकेच्या वतीने गेले नऊ वर्षांपासून छटपूजेची तयारी केली जाते. यंदा याठिकाणी होणाऱ्या छटपूजेचे दहावे वर्ष आहे. याव्यतिरिक्त यंदा रायलादेवी तलाव, कोलशेत , घोडंबदर, ब्रह्मांड, कळवा, मुंब्रा, शीळ-डायघर, मासुंदा तलाव अशा खाडी आणि तलावाच्या ठिकाणांसह शहरातील काही भागात महापालिकेच्या वतीने कृत्रीम तलाव देखील तयार केली जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
याठिकाणी कृत्रीम तलावांची व्यवस्था
शहराच्या ज्या भागात उत्तर भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे, अशा ठिकाणी महापालिकेच्या वतीने कृत्रीम तलाव तयार केली जाणार आहेत. वागळे इस्टेट भागातील इंदिरानगर, सावरकरनगर, लोकमान्य नगर, नळपाडा, गांधी नगर, आझाद नगर, मनोरमा नगर आणि बाळकूम अशा सात ठिकाणी ठाणे महापालिकेच्या वतीने कृत्रीम तलाव तयार केली जाणार आहेत.
उपवन येथे विविध सोयीसुविधा
उपवन तलावाजवळ रुद्र प्रतिष्ठान आणि ठाणे महापालिकेच्या वतीने छटपूजेचे आयोजन केले जाते. उपवन तलाव परिसरात मोठी जागा उपलब्ध असल्यामुळे याठिकाणी भव्य स्वरुपात तयारी केली जाते. यंदा देखील याठिकाणी धार्मिक गोष्टींच्या सोयी सुविधेसह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आसन व्यवस्था, नागरिकांना कपडे बदलण्यासाठी खोली, प्राथमिक उपचाराची व्यवस्था, रुग्णवाहिका, मोबाईल चार्जिंग सुविधा अशा विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत, अशी माहिती रुद्र प्रतिष्ठान चे धनांजय सिंग यांनी दिली.