एसटीच्या तिकिटांपेक्षा २५ ते १०० रुपये अधिक दर

ठाणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी बस सोडण्यास सुरुवात करण्यात आल्या आहेत. ठाण्यातील खोपट आणि वंदना या बस स्थानकांतून नाशिक, पुणे, सातारा आणि हैदराबाद या मार्गावर जाण्यासाठी या बस सुरू करण्यात आल्या असल्या, तरी या प्रवासाचे भाडे वाढीव असल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत आहे.

भिवंडी आणि शहापूर या बसस्थानकांतून ठाणे, वाडा आणि र्वांशद या मार्गावर खासगी बसगाड्या सोडण्यात येत आहेत.  एसटीच्या साध्या तिकीट दरापेक्षा निमआराम, शिवशाही या बसगाड्यांप्रमाणेच या खासगी बस सेवेतून दर आकारले जात आहेत. राज्यभरात मागील दोन आठवड्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारपासून ठाणे जिल्ह्यातील ठाणे १, ठाणे २, कल्याण, विठ्ठलवाडी, भिवंडी, वाडा, शहापूर आणि मुरबाड या आठही आगारांतील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली. प्रवाशांचे अधिक हाल होऊ नये यासाठी ठाणे जिल्ह्यात बुधवारपासून ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून खासगी बस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी ठाण्यातील खोपट आणि वंदना या बसस्थानकातून नाशिक, पुणे, सातारा,  कराड आणि हैदराबाद या भागात जाणाऱ्या १० खासगी बसगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

भिवंडी आगारातून शहापूर आणि ठाणे या ठिकाणी जाण्यासाठी १३ गाड्या सोडण्यात            आल्या होत्या. पहिल्याच दिवशी एकूण ३१ बसगाड्यातून ५८५ प्रवासी संख्या होती, तर गुरुवारी ठाण्यातील खोपट आणि वंदना बसस्थानकांतून पुणे, सातारा, कराड आणि हैदराबाद या भागात जाण्यासाठी ७ गाड्या सोडण्यात आल्या. भिवंडी आणि शहापूर आगारातून १० गाड्या ठाणे, वाडा आणि र्वांशद या ठिकाणी सोडण्यात आल्या. एकूण १७ बसगाड्यांमधून २५७ प्रवासी संख्या होती. प्रवाशांच्या मागणीनुसार ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून खासगी बसगाड्या सोडण्यात येत आहेत. दरम्यान, या खासगी बसगाड्यांचे भाडे हे निमआराम आणि शिवशाही या बसगाड्यांप्रमाणे आकारले जात आहे. त्यामुळे प्रवास करण्यासाठी नेहमीच्या दरापेक्षा २५ ते १०० रुपयांनी अधिक दर देऊन प्रवास करावा लागत आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या निमआराम आणि शिवशाही या गाड्यांप्रमाणेच ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून सोडण्यात आलेल्या खासगी गाड्यांचे दर आकारण्यात येत आहेत.

-विश्वंभर शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग