ठाणेः महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी देऊन त्यांच्या हाताला काम देण्याचा महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून लवकरच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील चिंदीपाडा येथे काथ्यापासून विविध गोष्टी निर्मितीचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प उभा राहत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यामतून हा प्रकल्प चालवला जाणार आहे. या प्रकल्पातून १०० हुन अधिक गरजू महिलांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे.

ठाणे जिल्हा महिला बालविकास विभागातर्फे तसेच जिल्हा परिषदेतर्फे संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भिवंडी येथे काथ्यापासून विविध गोष्टी निर्मितीचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जातो आहे. या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पातील यंत्र सामग्री, कच्च्या आणि तयार मालाची वाहतूक करण्यासाठी वाहने, काम करण्याऱ्या महिलांना प्रशिक्षण या सर्वांची पूर्तता जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रकल्पाला लागणारा वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी रोहित्र बसवण्यात येणार आहे.

हेही वाचा… भाज्यांच्या दरात पुन्हा वाढ; अवकाळी पावसामुळे भाज्यांच्या दरावर परिणाम; टोमॅटो आणि कांदा सत्तरी पार

मात्र यासाठी लागणारे उच्च दाब वहिनी ही वनविभागाच्या अखत्यारीतून जात आहे. यामुळे वन विभागाकडून याबाबतची परवानगी घेण्याची अंतिम प्रक्रिया सुरू आहे. यानंतर प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महिला बालविकास विभागातर्फे देण्यात आली आहे.

प्रकल्प नेमका कसा ?

या प्रकल्पात काथ्यापासून दोर, जाळ्या तसेच सर्वात महत्वाचे आणि सध्या प्रचंड मागणी असलेले कोकोपीट देखील या ठिकाणी तयार केले जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या सर्व यंत्र सामग्रीची उपलब्धता झाली आहे. या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा महिला बाल विकास विभागातर्फे अनोखी संकल्पना राबविण्यात येत आहे. भिवंडी आणि ठाणे शहरात शहाळे विकणाऱ्यांची यादी जिल्हा प्रशासनाने तयार केली आहे. त्यांनी शहाळे विकल्यानंतर उर्वरित कचरा गोळा केला जाणार आहे. यासाठी दोन मोठ्या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसातून दोन वेळेस या गाड्या हा सर्व कच्चामाल उचलून प्रकल्पाच्या ठिकाणी आणून ठेवणार आहेत.

बाजारपेठही उपलब्ध

कुंडीतील झाडांच्या वाढीसाठी खत म्हणून कोकोपीटला मोठ्या प्रमाणात मागणी असते. हीच गरज ओळखत जिल्हा महिला बालविकास विभागाने भिवंडी येथे प्रकल्पात तयार होणारे कोकोपीट पुण्यातील मोठ्या रोप वाटिकांना विकले जाणार आहे. तसेच इतर वस्तू ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये विक्रीसाठी नेण्यासाठी आखणी सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिवंडी येथे उभा राहत असलेला हा प्रकल्प महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रकल्प उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून काही परवानग्या मिळविण्याचे काम सुरू आहे. हे काम येत्या काही दिवसात पूर्ण होऊन प्रकल्प सुरू होईल. – महेंद्र गायकवाड, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, ठाणे