* ठाण्यातील घरांच्या किमती कोटीच्या घरात * स्वस्त घराच्या आशेने आलेल्या सर्वसामान्य ग्राहकांचा अपेक्षाभंग

निश्चलनीकरणानंतर घरांच्या किमती कमी होतील, हा अंदाज ठाण्यात गेल्या तीन दिवसांपासून भरलेल्या मालमत्ता प्रदर्शनाने खोटा ठरवला आहे. मुंबई, ठाण्यातील बडय़ा बिल्डरांनी या प्रदर्शनात विक्रीसाठी मांडलेल्या घरांचे गगनाला भिडलेले दर पाहून स्वस्त घरांच्या शोधात आलेल्या सर्वसामान्य ग्राहकांच्या पदरी निराशा पडली. शुक्रवारपासून भरलेल्या या प्रदर्शनात सुरुवातीचे दोन दिवस तर अगदी हातावर मोजता येतील इतकेच ग्राहक दिसून आले. रविवारी या ठिकाणी ग्राहकांची काही प्रमाणात गर्दी दिसली खरी मात्र येथील चढे दर पाहून अनेकांसाठी ते ‘गृह पर्यटन’ ठरले. सोमवारी तर याठिकाणी शुकशुकाट पसल्याचे चित्र होते.

बांधकाम क्षेत्रात एकंदर मंदीची चर्चा असली तरी ठाण्यासारख्या शहरात अजूनही घरांचे दर चढेच असल्याचे चित्र यंदाही पाहायला मिळाले. ठाणे परिसरात प्रामुख्याने घोडबंदर, शीळ तसेच भिवंडी या भागात मोठय़ा प्रमाणावर गृहप्रकल्पांची उभारणी होत असली तरी स्वस्त घरांच्या शोधात अजूनही ग्राहकांना अंबरनाथ, बदलापूरची वाट धरावी लागत असल्याचे चित्र आहे. नोटाबंदीनंतर घरांचे दर झपाटय़ाने खाली उतरतील, असे चित्र केंद्र आणि राज्य सरकारकडून रंगविले जात  होते. मात्र, ठाण्यातील घोडबंदर परिसरात गेल्या चार दिवसांपासून भरलेल्या मालमत्ता प्रदर्शनातील घरांचा ‘श्रीमंती’ थाट पाहून अनेकांच्या पदरी निराशा पडली.

या प्रदर्शनात वेगवेगळ्या विकासकांच्या ४५ ते ५० स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. मात्र, नोटाबंदीच्या पाश्र्वभूमीवर भरत असलेल्या या प्रदर्शनात सुरुवातीपासूनच उत्साह नव्हता. या प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवशी तर अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच ग्राहकांनी हजेरी लावली. रविवारी येथील ग्राहकांची गर्दी वाढली खरी मात्र स्वस्त घरांचे फारसे पर्याय उपलब्ध नसल्याने अनेकांनी प्रदर्शनस्थळावरून काढता पाय घेतला. या प्रदर्शनात अंबरनाथ, बदलापूर परिसरातील २५ ते ३५ लाख रुपयांची ४०० ते ५०० चौरस फूट आकारांची काही घरे विक्रीसाठी मांडण्यात आली होती. मात्र, ठाण्यात स्वस्त घराच्या शोधात येणाऱ्या ग्राहकांपुढे घोडबंदरच्या अगदी टोकाला ५५ ते ६० लाखांच्या कमी आकारच्या घरांचा पर्याय मांडला जात असल्याने घरांचे दर कमी होणार कधी असा सवाल उपस्थित केला जात होता.

श्रीमंती घरांचा थाट

या प्रदर्शनात हिरानंदानी, रुस्तमजी, कल्पतरु, मान, लोढा अशा मोठय़ा बिल्डरांमार्फत उभारल्या जाणाऱ्या टाऊनशिपमधील घरे विक्रीसाठी मांडण्यात आली होती. मात्र या घरांच्या किमती ७० लाखांपासून अगदी आठ कोटी रुपयांपर्यंत होत्या. हिरानंदानीसारख्या मोठय़ा प्रकल्पात ४१९ चौरस फूट कार्पेट एरिया असलेल्या लहान घराची किंमतही ७५ ते ८० लाखांच्या पुढे असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत होते.

दर वर्षीप्रमाणे यंदाही प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. निश्चलनीकरणाच्या प्रभावातून आता सर्व स्थिर होत आहे. या प्रदर्शनाला ग्रहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, तसेच घर खरेदीची नोंदणीही चांगली झाली. हे प्रदर्शन केवळ कोटय़वधी रुपयांच्या घरांचे नव्हते तर येथे स्वस्त आणि किफायतशीर घरांचे पर्यायही ग्राहकांपुढे होते. त्यामुळे हे प्रदर्शन फसले असे म्हणता येणार नाही.

– सचिन मिरानी, सचिव, एमसीएचआय