पालिकेसाठी उत्पन्नाचा नवा स्रोत, वीज वापरावर शुल्क आकारणी  

ठाणे : महापालिका प्रशासनाने पुन्हा चार्जिग केंद्रांच्या उभारणीसाठी नवा प्रस्ताव तयार करून येत्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. या प्रस्तावानुसार खासगी लोकसहभागातून ५० चार्जिग केंद्र उभारण्याचे प्रस्तावित असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३० चार्जिग केंद्र  उभारणीकरिता पालिकेने जागा निश्चित केल्या आहेत. चार्जिग केंद्रांवर वापरलेल्या एकूण वीज वापरावर प्रति युनिटप्रमाणे १ रुपया शुल्क महापालिका घेणार असून यामुळे पालिकेला उत्पन्नाचा नवा स्त्रोत मिळणार आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण राज्य शासनाकडून राबविले जात आहे. या धोरणानुसार २०२५ पर्यंत नवीन वाहन नोंदणीत १० टक्के हिस्सा विद्युत वाहनांचा असणार आहे. २०२५ पर्यंत टीएमटीच्या ताफ्यात विजेवरील बसची संख्या ५० टक्के करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. विजेवरील वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन मिळावे यासाठी पालिकेने गृहसंकुलात चार्जिग केंद्र  उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. 

चार्जिग केंद्रे उभारणाऱ्यांना मालमत्ता करात सवलत देण्याची योजना पालिकेने आखली असून यासंबंधीच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिली आहे. त्यापाठोपाठ आता शहरात खासगी लोकसहभागातून ५० चार्जिग केंद्र  उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३० चार्जिग केंद्र उभारणीकरिता पालिकेने जागा निश्चित केल्या आहेत. ठाणे शहरात विविध प्रभाग समिती अंतर्गत लोकवस्ती असलेल्या रस्त्याच्याकडेला ही चार्जिग केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या चार्जिग केंद्रांकरिता अंदाजे ४ ते ५ मीटर रुंद आणि २० ते ३० मीटर लांब जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून अशा ३० जागांची यादी पालिकेने निश्चित केली आहे. या केंद्रांकरिता पालिका संबंधित संस्थेला निविदा दरानुसार जागा उपलब्ध करून देणार आहे. चार्जिग केंद्रावर वापरलेल्या एकूण वीज वापरावर प्रति युनिटप्रमाणे १ रुपया शुल्क महापालिका घेणार असून यामुळे पालिकेला उत्पन्नाचा नवा स्त्रोत मिळणार आहे. खासगी लोकसहभागातून या केंद्रांची उभारणी केली जाणार असल्याने पालिकेवर कोणत्याही खर्चाचा भार पडणार नाही.

चार्जिग केंद्रांची यादी

  • नौपाडा कोपरी – पांचपाखाडी हुंडाई सव्‍‌र्हीस रोड समोर, मेंटल हॉस्पीटल  चौक, चिखलवाडी जंक्शन, कोपरीगाव,
  • उथळसर – वृंदावन बसस्टॉप, कचराळी तलाव, आकाशगंगा रोड, साकेत ल्ल वागळे – रोड नं. २२, पासपोर्ट ऑफीस जवळ
  • लोकमान्य सावरकर – लोकमान्य बस डेपो, पोखरण रोड नं. १, देवदयानगर  जंक्शन
  • वर्तकनगर – पोखरण रोड नं. २, गांधीनगर जंक्शन, बेथनी हॉस्पीटल  वळण, डॉ. काशिनाथ घाणोकर नाटयम्गृह, मानपाडा जंक्शन, नीळकंठ ग्रीन चौक,
  • माजिवडा – मानपाडा – आनंद नगर बस डेपो, पातलीपाडा येथील सुविधा भुखंड, आनंद जंक्शन, लोढा, माजिवडा युआरसीटी, हायलॅन्ड हेवन, वाघबीळ जंक्शन, पातलीपाडा रोड.
  • कळवा-  खारेगाव ९० फीट रोड, खारेगाव टोलनाका, विटावा जकात नाका, रेतीबंदर.
  • मुंब्रा –  मुंब्रा फायर ब्रिगेड जवळ
  • दिवा – शिळ – दिवा रोडवरील दिवाटर्न जंक्शन, शीळ फायर ब्रिगेड