नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला गेल्यामुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी दिलेल्या मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव वरिष्ठांनी अमान्य केला आहे. पक्षाच्या आदेशानंतर पदाधिकाऱ्यांनी बंडाची तलवार म्यान केली असली तरी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांचा प्रचार करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठांपुढे नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड या मतदार संघाचा समावेश आहे. आगरी, कुणबी, आदिवासी अशा मतदारांचा भारणा असलेल्या हा मतदार संघ आहे. या मतदार संघात २००९ मध्ये काँग्रेसचा खासदार निवडून आला होता तर, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. यामुळे महायुतीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसला मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. पण, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला गेल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले. यातूनच त्यांनी बंडाचे निशाण हाती घेतले होते.

आणखी वाचा-चोरीसाठी विमानाने मुंबईचा प्रवास, नागालँड आसाम मधील चोरट्याला अटक

काँग्रेसमधून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे आणि काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्यासह जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे इच्छुक होते. त्यापैकी सांबरे यांनी जिजाऊ विकास पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची घोषणा केली. तर, सुरेश टावरे आणि दयानंद चोरगे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्याविरोधात दंड थोपटत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांना दिला होता. तसेच सुरेश म्हात्रे यांचे निवडणुकीत काम करायचे नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. परंतु देशातील इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीचा विचार करून काँग्रेसच्या वरिष्ठांनी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव अमान्य केला. तसेच कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम करण्याचे आवाहन वरिष्ठांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आणखी वाचा-उमेदवारी जाहीर झालेली नसतानाही संजीव नाईक यांचा प्रचार सुरू, शिवसेनेमध्ये अस्वस्थता

काँग्रेसच्या वरिष्ठांपुढे मोठे आव्हान

मैत्रीपूर्ण लढत लढत झाली नाही तर घरी बसू किंवा काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर त्यांचे काम करू, अशी भूमिका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी घेतली होती. परंतु काँग्रेसच्या वरिष्ठांनी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव अमान्य करत महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम करण्याचे आवाहन केले. पक्षाच्या आदेशानंतर पदाधिकाऱ्यांनी बंडाची तलवार म्यान केली असली तरी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांचा प्रचार करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठांपुढे नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशात इंडिया आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूका लढविण्यात येत आहेत. राज्यातील भिवंडी आणि सांगली या दोन जागांवरून इंडिया आघडीत बिघाडी नको म्हणून पक्षाच्या वरिष्ठांनी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव अमान्य केला आहे, अशी माहिती काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांनी दिली.