डोंबिवली – कुटुंबीयांबरोबर असलेल्या ओळखीतून डोंबिवलीतील एका विवाहित तरूणाने या कुटुंबातील एका १५ वर्षाच्या बालिके बरोबर आपले प्रेमसंबंध वाढविले. या प्रेमातून या विवाहित तरूणाने बालिकेवर लैंगिक अत्याचार केले. ही बालिका गर्भवती राहिल्यावर या विवाहित तरूणाने बालिकेला डोंबिवली जवळील एका पती, पत्नीच्या ताब्यात या बालिकेचा गर्भपात करण्यासाठी दिले. या पती, पत्नीने या पीडित बालिकेचा वेश्या व्यवसायासाठी वापर केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आहे.
मागील दोन महिन्याच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी डोंंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात पीडित बालिकेच्या व तिच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरण, लैंगिक अत्याचार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पती, पत्नी आणि या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन ग्राहक तरूणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी फरार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती, अशी पीडित बालिका डोंबिवलीजवळ गावात आई, भावासह राहते. पीडित बालिकेच्या कुटुंबीयांचा ओळखीचा विवाहित तरूण आहे. त्याचे आणि पीडित बालिकेच्या कुटुंबीयांचे स्नेहसंबंध आहेत. पीडित बालिका आणि आईमध्ये वाद झाला की बालिका रागावून या विवाहित तरूणाकडे जाऊन राहत होती. विवाहित तरूण आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाल्याने त्याची पत्नी माहेरी उत्तरप्रदेशात निघून गेली.
पत्नी माहेरी गेल्यानंतर विवाहित तरूण पीडित बालिकेला लळा लावू लागला. एक दिवस पीडित बालिका आपल्या भावासह विवाहित तरूणाच्या घरी रात्री गेली होती. त्यावेळी बालिकेने विरोध करूनही तरूणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. असे तो प्रकार नंतर बालिकेबरोबर करू लागला. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस म्हणून धमकी दिली. एक दिवस आपली मुलगी घरातून गायब असल्याचे आणि ती अनेक दिवस घरी न आल्याचे समजल्यावर पीडितेच्या आईने मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती.
पीडितेला नियमित येणारी मासिक पाळी बंद झाली. तिला उलट्या सुरू झाल्या. हा विषय पीडितेने विवाहित तरूणाला सांगितला. त्याने आपल्या परिचित एक महिला डोंंबिवलीजवळ आहे. ती तुझा गर्भपात करून देईल, असे सांगितले. विवाहित तरूणाने पीडितेला त्या महिलेच्या घरी नेले. तेथे तिचा पतीपण होता. या महिलेने पीडितेला आम्ही तुझा गर्भपात करून देऊ, तुला गोळ्या देऊ पण यासाठी तुला आम्ही सांगू त्याच्या बरोबर शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असे सांगितले. महिलेच्या इशाऱ्यावरून आळीपाळीने डोंबिवलीतील दोन तरूणांनी बालिका गर्भवती असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार महिलेच्या घरात केले. या बदल्यात या पती, पत्नीने दोन्ही तरूणांकडून दहा हजार रूपये घेतले. त्यामधील एक पैसाही बालिकेला दिला नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.
या गुन्ह्याप्रकरणी पाॅक्सो, अपहरण असे गुन्हे दाखल करून पती, पत्नीसह चार जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.- सुहास हेमाडे, साहाय्यक पोलीस आयुक्त,डोंबिवली.