ठाणे – दिव्यांगांना सहा हजार मासिक मानधन,शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव द्यावा तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशा विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थाना बाहेर बुधवारी रक्तदान करत आंदोलन केले. यावेळी त्यांनी मागण्या पूर्ण करण्या संदर्भात घोषणा केल्या.
शेतकरी कर्ज माफी करावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा तसेच काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु असे आश्वासन राज्य सरकरारकडून देण्यात आले होते. परंतू, शेतकऱ्यांचा सातबारा अद्याप कोरा झालेला नाही. त्यासह, दिव्यांगांना ६ हजार रुपये मासिक मानधन मिळावे त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा अशा मागण्यांठी प्रहार जनशक्ती पक्षाने एप्रिल महिन्यात आंदोलन केले होते. परंतू, एक महिना होऊन गेला तरी राज्य सरकारने या मागण्यांच्या बाबतीत ठोस भूमिका घेतलेली नाही. राज्य सरकारचे या मागण्यांकडे लक्ष वेधावे यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थाना बाहेर रक्तदान करत अनोखे आंदोलन केले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्येकर्ते तसेच दिव्यांग नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. ‘शेतकरी कर्ज माफी करा’ ‘दिव्यांगांना मानधन द्या’ अशा विविध घोषणा या आंदोलनात देण्यात आल्या. आंदोलना दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या मागण्यांबाबत माझी सकारात्मक भूमिका असून येत्या काही दिवसात यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना त्यांनी दिले.