पूर्वसीमा विकास प्रतिष्ठानचा उपक्रम; वैद्यकीय शिबिरांतून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुग्णसेवेतून राष्ट्रीय एकात्मता रुजविण्यासाठी पूर्वसीमा विकास प्रतिष्ठानने नवा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत पुणे आणि सातारा येथील तीन वैद्यकीय व्यावसायिकांनी ईशान्येकडील मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यतील खारासोम आणि चुडाचंदपूर जिल्ह्यतील नगलोलमॉल येथे आरोग्य शिबिरे घेऊन रुग्णसेवा केली.

पुण्यातील डॉ. वैभव वनारसे, सुनंदा वनारसे हे दाम्पत्य तसेच सातारा जिल्ह्य़ातील वाई येथील डॉ. माधवी जोग या उपक्रमात सहभागी झाल्या. इम्फाळपासून १६० किलोमीटरवर असलेल्या खारासोम या अतिशय दुर्गम खेडय़ातील शाळेच्या वास्तूत ७ एप्रिलला पहिले आरोग्य शिबीर झाले. शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थ मिळून १८० जणांची वैद्यकीय तपासणी या वेळी करण्यात आली. त्यानंतर ११ एप्रिलला चुडाचंदपूर जिल्ह्य़ातील नगलोलमॉल येथील संस्थेच्या शाळेत दुसरे शिबीर झाले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास २०० जणांनी त्याचा लाभ घेतला. विशेष म्हणजे या तिन्ही डॉक्टरांनी स्वखर्चाने या भागात येऊन रुग्णांची विनामूल्य तपासणी केली. प्रतिष्ठानचे जयवंत कोंडविलकर, नरेंद्र किणी, संस्कार भारती संस्थेच्या अंजली विश्वास काणे, रोटरीचे देवेंद्र जैन आदी त्यांच्यासोबत होते.

चार दशकांपूर्वी भैयाजी काणे या महाराष्ट्रातील एका संवेदनशील मनाच्या ध्येयवादी शिक्षकाने अशांत आणि अस्वस्थ मणिपूरमधील सीमावर्ती प्रदेशात जाऊन तिथे शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या दुर्गम प्रदेशातील मुलांना महाराष्ट्रात आणून शिकविण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. त्याचा लाभ घेऊन शिकलेले जॉय होराम, हॅपी मून, शंकन, तोहलाल हाऊकिपसह अनेक जण भैयाजी काणेंना अभिप्रेत असलेली राष्ट्रीय एकात्मतेची भावना स्थानिक नागा आणि कुकी समाजांत रुजविण्यात प्रतिष्ठानला मदत करीत आहेत.

गेल्या वर्षी गणेशोत्सवात ‘लोकसत्ता’ने राबविलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमामुळे महाराष्ट्रातील लाखो जणांपर्यंत संस्थेचे कार्य पोहोचले. भैयाजी काणे यांच्या नावाने प्रतिष्ठानतर्फे मणिपूरमध्ये सध्या तीन शाळा चालविल्या जातात. फुटीरतावादी गटांकडून होत असलेल्या विखारी अपप्रचाराला बळी न पडता येथील नव्या पिढीच्या मनात एकात्मतेचा विचार रुजविण्याचा प्रयत्न या शाळांद्वारे केला जात आहे. शिक्षणाबरोबरच या दुर्गम डोंगराळ प्रदेशात आरोग्य सुविधांचीही वानवा आहे. त्यामुळे राज्यातील वैद्यकीय व्यावसायिकांनी येथे येऊन शिबिरे घ्यावीत, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

शिक्षकांचेही योगदान

डॉक्टरांप्रमाणेच राज्यातील शिक्षकांनीही प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत मणिपूरमधील या शाळांमध्ये काही दिवस मानद सेवा देण्यास सुरुवात केली आहे. सध्या पुण्यातील हेमलता होनवाड आणि अलका वैद्य या दोन शिक्षिका मणिपूरमध्ये आहेत. संस्थेच्या तिन्ही शाळांमध्ये प्रत्येकी दहा दिवस राहून त्या तेथील विद्यार्थी तसेच शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. हेमलता होनवाड गेल्या वर्षीही दहा दिवसांसाठी मणिपूरमध्ये आल्या होत्या. या परिसरात गणित आणि विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांची अधिक आवश्यकता आहे.

मणिपूरमधील डोंगराळ भागात अतिशय दुर्गम ठिकाणी वैद्यकीय तपासणी करण्याची संधी मिळाल्याने गाठीशी नवा अनुभव मिळाला. इतर अनेक बाबींप्रमाणेच या प्रदेशात आरोग्य सुविधांचीही आबाळ आहे. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही जीवनाला आनंदाने सामोरे जाण्याच्या येथील लोकांच्या समाधानी वृत्तीला सलाम करायलाच हवा.   डॉ. वैभव वनारसे, पुणे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purvasima development foundation medical camp
First published on: 16-04-2017 at 00:43 IST