मध्य रेल्वे स्थानकावरील डोंबिवली-कोपर रेल्व स्थानकांच्या दरम्यान शनिवारी रात्री सव्वा आठ वाजता मुंबई दिशेने जाणारी वातानुकूलित लोकल तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. एक तास झाला तरी बिघाड सापडत नसल्याने कल्याणहून मुंबई दिशेने धिम्या गतीने जाणाऱ्या लोकल जागोजागी खोळंबून राहिल्या होत्या.
शनिवारी रात्री सव्वा आठ वाजता कल्याणहून आलेली एक वातानुकूलित लोकल छत्रपती शिवाजी टर्मिनस दिशेने धिम्या गती मार्गावरुन धावत होती. डोंबिवली रेल्वे स्थानक सोडल्यानंतर कोपर रेल्वे स्थानका जवळ वातानुकूलित लोकलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला. लोकल बंद पडली. पंधरी मिनिटे झाली तरी लोकल जागची हालत नसल्याने प्रवासी अस्वस्थ झाले.
हेही वाचा >>>भिवंडी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत राज्य सरकारकडून जाहीर
फलाट दोन वरुन कल्याणकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचा या तांत्रिक बिघाडामुळे खोळंबा झाला. ठाकुर्ली, पत्रीपूल दिशेने लोकलच्या रांगा लागल्या होत्या. बिघाड झाल्यानंतर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. शनिवार सरकारी कार्यालयीन सुट्टीचा दिवस असल्याने लोकलला गर्दी कमी होती. कर्जत, कसाराकडून येणाऱ्या लोकल कल्याण, विठ्ठलवाडी दिशेने थांबून होत्या.
रात्री दहा वाजता बंद पडलेली लोकल मार्गीकेतून बाहेर काढण्यासाठी एक इंजिन आणण्यात आले होते. दरम्यान,वातानुकूलित लोकलमधून उतरून डोंबिवली स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या एका प्रवाशाला लोकलची धडक बसली आणि तो जागीच मरण पावला.