मुस्लीम धर्मात सर्वात पवित्र समजला जाणारा ‘रमजान’चा महिना सध्या सुरू आहे. कडक, निर्जळी उपवास अर्थात रोजे करण्याचा महिना असलेल्या ‘रमजान’चे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, प्रामुख्याने या काळातच खायला मिळणारे तऱ्हेतऱ्हेचे चविष्ट खाद्यपदार्थ. रोजा सोडण्याच्यावेळी मुस्लीम बांधवांसोबतच इतर धर्मीयांचीसुद्धा हे पदार्थ चाखण्यासाठी मोहम्मद अली रोड, माहीम, वांद्रे, कुर्ला, मुंब्रा या मुस्लीमबहुल भागात मोठी गर्दी होत असते. परंतु हेच पदार्थ मुंबई उपनगरामध्ये कुठे मिळतात, असा प्रश्न विचारला तर पटकन उत्तर देता येणार नाही. म्हणूनच आज मी तुम्हाला मुंबई उपनगरातील आवर्जून भेट द्यावी अशा जागेबद्दल सांगणार आहे. मीरा रोड येथील ‘रफीस दस्तानखान’मध्ये रमझानच्या काळात विविध लज्जतदार पदार्थ चाखता येतीलच, पण वर्षभरात केव्हाही सहकुटुंब पारंपरिक मध्य आशियाई पद्धतीच्या पदार्थाचाही आस्वाद घेता येईल.
इफ्तारसाठी वेगवेगळ्या पदार्थाची सध्या येथे रेलचेल आहे. महिनाभर उपवास चालत असल्याने दररोज नवीन पदार्थाची भर पडते. त्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारचे पदार्थ आहेत. मसाला बटाटा, चना मसाला, चीज बॉल्स, नगेट्स, स्प्रिंग रोल, चिकन कबाब, चीज चिकन, रॉकेट चिकन, बोनलेस, मंचुरीयन, चिकन फिंगर्स, चिकन क्रिस्पी, तंदुरी, तंदुर ड्रमस्टीक, थ्रेडेड चिकन, चिकन नान, चिकन बैदा रोटी, पहाडी, रेशमी आणि मसाला अशा तीन प्रकारच्या चिकन स्टिक्स, चिकन साटे, चिकन रोल, बटाटा आणि चिकनपासून तयार केलेला नर्गिसी कबाब, चिकन पॉपकॉर्न पॅटीस, रशियन कबाब, चिकन समोसा, अंडय़ाचं आवरण असलेली चिकन स्टिक, चिकन कटलेट, कांद्याची हिरवी पात असलेला मटण समोसा, शॉर्मा अशी ही न संपणारी यादी. त्याशिवाय मेन कोर्ससाठी मटण निहारी, मटन पाटा, मटण खिमा, आलू गोश, व्हाईट चिकन, चिकन स्टिव्ह, चिकन मखनी, चिकन अंगारा हे पदार्थ आहेतच. ते रोटी किंवा राईससोबत खाता येतात. गोड पदार्थामध्ये मालपोवा, फिरणी आणि कॅरमल कस्टर्ड हे पदार्थ आहेतच. तीस ते शंभर रुपयांपर्यंत पदार्थाच्या किमती आहेत. तसेच वरील सर्व पदार्थ रमझानच्या काळातच सायंकाळी पाचनंतर उपलब्ध असतात हेदेखील लक्षात असू द्या.
दस्तरखानची सुरुवात रमझानच्या एक महिनाआधी एप्रिल २०१५ मध्ये झाली. लईक खान आणि मोहम्मद अर्शीयान जुम्मानी हे दोघे भाऊ दस्तरखानची धुरा सांभाळत आहेत. त्यापैकी अर्शीयान हे प्रशिक्षित शेफ असून त्यांची संकल्पना असेलली ‘निझामी थाल’ इथली खासियत आहे. संपूर्ण मुंबईत फक्त याच ठिकाणी तुम्हाला ही थाल खायला मिळेल. विविध प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ एकाच वेळी खाता येत नाही. फार फार तर स्टार्टरमध्ये तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. परंतु निझामी थालमध्ये स्टार्टर आणि मेन कोर्सची सांगड उत्तमरीत्या घालण्यात आली आहे. त्यातही रेग्युलर आणि स्पेशल असे दोन प्रकार आहेत. रेग्युलरमध्ये मलाई, मूर्ग, कालिमिरी, लसूणी, रेशमी टिक्का आणि चटपटा कबाब असे सहा प्रकारचे अठरा (प्रत्येकी तीन) बोनलेस टिक्के, अर्धी चिकन तंदुरी, तव्याच्या प्रकारामध्ये चिकन रोल, चिकन बैदा रोटी, भूना मसाला आणि मोगलाई अशा दोन प्रकारच्या ग्रेव्ही, आठ भाग केलेले दोन मोठे बटर नान इतक्या सर्व पदार्थानी ही फूटभर लांब थाल सजलेली असते. तर स्पेशल थालमध्ये रेग्युलरमधील सर्व पदार्थासह अनेक पदार्थावर चीज आणि चिकन टिक्का बिर्यानीचा अंतर्भाव असतो. हे सर्व वाचूनच तुमच्या लक्षात आलं असेल की ही थाल संपवणं एका व्यक्तीचं काम नाही. बरोबर आहे, ती संपवायला चांगल्या खाणाऱ्या चार ते पाच व्यक्ती लागतात. या राजेशाही थालची किंमत पंधराशे रुपये असली तरी त्यातील पदार्थाची संख्या, प्रकार आणि मुख्य म्हणजे चव यामध्ये ही किंमत वसूल होते. दस्तरखानचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे जेवायला बसण्याची पद्धत. इतर हॉटेलप्रमाणे येथे टेबल, खुच्र्या नसून जमिनीपासून दोन फूट उंच असा मध्यभागी मोठा काचेचा चौथरा आणि बाजूला मांडी घालून बसता येईल अशी तीन बाजूने सोफ्याची व्यवस्था आहे. त्यामुळे मध्यभागी जेवण आणि गोल बसून आरामात गप्पा मारत खाता येतं.
राईसच्या बाबतीतही केप्सा, रान बिर्याणी आणि मंदी राईस हे तीन अतिशय वेगळे आणि मुंबईत एकाच छताखाली खायला मिळणार नाहीत असे प्रकार येथे मिळतात. केप्सामध्ये मोगलाई आणि इंडो-चायनीज असे दोन प्रकार आहेत. तर रान बिर्याणीही तीन प्रकारांत मिळते. बिर्याणी राईस, मटण मसाला आणि त्यावर सळीसकटच मटणाच्या मोठय़ा तुकडय़ाला बार्बेक्यू करून ठेवलेलं असतं. मंदी राईस हा टर्कीश पदार्थ तर मुद्दामहून खावा असाच आहे. मटण शिवलेल्या स्टॉकमध्येच केवळ हळद आणि उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्यांसह भात शिजवला जातो आणि शिजवलेला मटणाचा तुकडा, मटण कटलेट आणि लाल रंगाच्या तिखट चटणीसोबत सव्र्ह केला जातो. अर्धी तंदूरी असलेली मूर्ग दस्तरखान स्पेशल ग्रेव्ही, मूर्ग मेथी मलाई, मूर्ग कालिमीरी, डब्बा चिकन, अचारी मटण, रारा मटण, तंगडी कुल्फी कबाब हे येथील आणखी काही उल्लेखनीय पदार्थ.
एकूणच रमझानच्या काळात चांगल्या नॉनव्हेज पदार्थाचा आस्वाद घ्यायचा असेल, काहीतरी नवीन खायचं असेल, गर्दी टाळायची असेल आणि उपनगरातील लोकांना फार प्रवास करायचा नसेल तर रफीस दस्तरखान हा मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबासोबत जाण्यासाठी अतिशय चांगला पर्याय आहे.
रफीस दस्तरखान
कुठे – शॉप Rमांक ५, अँस्टर बिल्डिंग, जांगिड एन्क्लेव्ह, कनाकिया रोड, मीरा रोड (पूर्व), मुंबई – ४०११०७
कधी – दुपारी १ ते रात्री १२ वाजेपर्यंत
Twitter – @nprashant
nanawareprashant@gmail.com