लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण – बाजारपेठा खरेदीसाठी गजबजलेल्या असतानाच मंगळवारी दुपारी एका उधळलेल्या रेड्याने भर कल्याण मधील बाजारपेठेत धुमाकूळ घातला. चौखुर उधळत हा रेडा दुचाकी, चारचाकी, पादचाऱ्यांना धडक देत सुसाट धावत सुटला होता. बेभान झालेल्या या रेड्याला अखेर एका सोसायटीच्या आवारात कोंडण्यात आले. अग्निशमन जवान, पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी चार तासाच्या अथक प्रयत्नाने जेरबंद करून रेड्याची रवानगी पांजरपोळात केली.

कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकातून मंगळवारी दुपारी एक उधळलेला रेडा चौखुर धावत पारनाका, दूधनाका या वर्दळीच्या भागात शिरला. सुसाट धावत असलेल्या या रेड्याला पाहून वाहन चालक, पादचारी, विक्रेते यांची पळापळ होत होती. शाळकरी मुले, त्यांचे पालक यांनी तर रेड्याचा धसका घेतला होता. रेड्याने धुमाकूळ घातला असल्याची माहिती तातडीने पालिका, पोलीस, अग्निशमन जवान यांना देण्यात आली. तोपर्यंत रेड्याचा बैलबाजार भागातील बाजारपेठेत, नागरी वस्तीमध्ये धुमाकूळ चालू होता. बेभान झालेला रेडा पकडण्यासाठी काही नागरिक हातात काठ्या घेऊन त्याच्या मागे लागले होते. बैलबाजार भागात रेडा एका सोसायटीच्या आवारात गेल्यावर पाठलाग करणाऱ्या नागरिकांनी तातडीने सोसायटीची लोखंडी प्रवेशव्दारे बंद केली. रेड्याला बंदिस्त केले. सोसायटीच्या रहिवाशांनी रेडा घरात येईल या भीतीने दरवाजे बंद करून घेतले. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, पालिका पथके घटनास्थळी आली. त्यांनी रेड्याला दोरखंडाने बंदिस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले. चार तास झाले तरी बेभान रेडा पथकांना दाद देत नव्हता. दोरखंडाचे पेच करून त्याला अडकविले जात होते.

आणखी वाचा-‘एमएमआरडीए’चा ठाण्यावर निधीवर्षांव; विविध प्रकल्पांसाठी १३०० कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर चार तासाच्या प्रयत्नानंतर रेड्याला दोरखंडामध्ये जखडून ठेवण्यात पथकांना यश आले. त्याला एका विजेच्या खांबाला बांधून ठेवण्यात आले. हा रेडा सुटला तर पुन्हा बेभान होऊन जीवित हानी करण्याची शक्यता विचारात घेऊन पालिकेने रेड्याची पांजरपोळ येथे रवानगी केली. रेड्याची रवानगी केल्यानंतर लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.