ठाणे – मध्य रेल्वेच्या मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानकातील दुरुस्ती कामासाठी छताचे पत्रे काढण्यात आल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या. छताचे काम पुर्ण झाले नाहीतर पत्रे नसलेल्या भागात पावसाच्या पाण्यामुळे प्रवाशांना भिजावे लागेल, अशी शक्यता होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने सर्व फलाटांवरील जीर्ण झालेले पत्रे काढून नवे छत उभारणीचे काम पुर्ण केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

ठाणे शहर तसेच त्यापलीकडील शहरांमधून मुंबईत कामानिमित्ताने अनेक प्रवासी प्रवास करतात. तसेच ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बरमार्गे नवी मुंबईच्या दिशेने अनेक प्रवासी जात असतात. यामुळे ठाणे स्थानकात कायमच गर्दीचे दृश्य असते. तसेच ठाणे शहरातील वागळे इस्टेट भागात औद्योगिक कंपन्या आणि लघु उद्योग आहेत. तसेच विविध खासगी कार्यालये देखील आहेत. त्यामुळे इतर शहरातून दररोज रेल्वे मार्गे नोकरदार ठाणे शहरात येतात. रेल्वेने प्रवास करताना रखडलेले वेळापत्रक, पुलांवरील गर्दी, फलाटांवरील तुटलेल्या फरशा, दुरावस्थेतील छते अशा विविध समस्यांना प्रवासी सामोरे जावे लागते. त्यावर उपाय म्हणुन मध्य रेल्वे प्रशासन वेळोवेळी दुरूस्तीचे कामे हाती घेत असते. याच अंतर्गत काही दिवसांपुर्वी ठाणे रेल्वे स्थानकात प्रशासनाच्यावतीने फलाटावरील छताच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. याकरिता ठाणे स्थानकातील फलाटावरील छत काढण्यात आले होते. फलाटांवरील जीर्ण झालेले छत काढून स्थानकातील सर्व फलाटांवर नवे छत उभारण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहा वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. फलाट पाचवरुन मुंबईहून कसारा, कर्जत, कल्याणच्या दिशेने जलद उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक होते. तर, फलाट सहावरुन मुंबईच्या दिशेने जलद उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक होते. त्यामुळे स्थानकातील इतर फलाटांच्या तुलनेत या फलाटावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. यामुळे दोन वर्षांपुर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने या फलाटाची रूंदी वाढविली होती. रूंदीकरण केलेल्या फलाटावर पावसापासून बचावासाठी तात्पुरते बांबूचे ताडपत्रीचे छत उभारण्यात आले होते. त्यानंतर काही महिन्यांनी बांबूचे छत काढून त्या भागात पत्र्याचे छत उभारले गेले. असे असले तरी काही भागात छत नव्हते. याठिकाणी छत उभारणीचे काम करण्यात येत होते. तसेच इतर फलाटावरील छतांच्या दूरूस्तीचे काम देखिल करण्यात येत होते. सद्यस्थितीत संपुर्ण फलाटांवर नवे छत उभारण्यात आले आहे.