Thane rain update, TMC ठाणे – शहरात शनिवार सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावासामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. शनिवारी सुरु झालेला हा पाऊस रविवारी देखील कायम होता. दुपारी ३.३० वाजेपर्यंत २७.९४ मिमी पाऊस पडल्याची नोंद ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आली आहे.

गेले अनेक दिवस दडी मारुन बसलेल्या पावसाने शनिवारी ठाणे शहरात हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याने १५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान ठाणे जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार, १५ ऑगस्ट म्हणजेच शनिवारी सकाळपासून ठाणे शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी सकाळी ११ नंतर पाऊस कमी झाला असला तरी, पावसाची रिपरिप सुरुच होती. परंतु, सायंकाळी ७ नंतर या पावसाने पुन्हा जोर धरला होता. या पावसाने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते.

ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे असलेल्या नोंदणीनुसार शनिवारी रात्री १०. ३० पर्यंत ठाणे शहरात ४२. ६४ मिमी पाऊस पडला. तर, या पावसाचा जोर रविवारी मध्यरात्री तसेच दिवासाही कायम होता. रविवार असल्याकारणामुळे अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन केले होते. परंतु, या मुसळधार पावसामुळे अनेकांचा हिरमोड झाला. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापनकडे आलेल्या माहितीनुसार ठाणे शहरातील भक्ती मंदीर परिसरात एक भल्लेमोठे झाड पडले. तर, एका ठिकाणी भिंत कोसळल्या घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतिही जिवीत हानी झालेली नाही. ठाणे शहरात रविवारी सकाळी ८.३० ते दुपारी ३.३० या कालावधीत २७.९४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.