कल्याण – उन्हाच्या काहिलीने नागरिक हैराण झालेले असतानाच मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता अचानक धुळीचे बेफाम वादळ आले. त्या पाठोपाठ मुसळधार पावसाने सुरूवात केली. अचानक आलेल्या धुळीच्या वादळाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडवली. वाऱ्याच्या वेगाने इमारतींवरील पत्रे, बाजारपेठांमधील निवारे कागदाच्या कपट्यासारखे हवेत उडून गेले.

धुळीने परिसर भरून गेला होता. उडून गेलेल्या वस्तू पकडण्यासाठी नागरिकांची धावाधाव दिसत होती. रस्त्याच्या कडेला दुचाकी वाऱ्याच्या वेगाने कलंडून पडल्या. पाऊस सुरू होताच वाऱ्याचा वेग कमी झाला. आणि धुळीच्या वादळामुुळे घरात दडून बसलेले रहिवासी, इमारतींच्या आडोशाला उभी असलेले नागरिक उन्हाची काहिली शमविण्यासाठी पावसात भिजण्यासाठी बाहेर पडली. पावसाचा आनंद घेण्यासाठी लहान मुले मोठ्या संख्येने इमारतीच्या गच्चीवर, इमारतींसमोरील जागेत नाचत बागडत होती. पावसाची गाणी गात होती. लहान मुलांसोबत घरातील महिला, पुरूष, तरूण, तरूणी पावसाच्या धारा अंगावर घेत वळीव पावसाचा आनंद घेत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जोरदार वाऱ्यांमुळे कल्याण डोंबिवली शहरांच्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. कामावरून घरी परतणाऱ्यांची रेल्वे स्थानकांमध्ये कोंडी झाली. त्यामुळे रेल्वे स्थानकांच्या प्रवेशव्दारांवर प्रवाशांची पावसाने कोंडी केली होती. जोरदार वाऱ्यामुळे रिक्षा चालक वाहनतळांवरून घरी निघून गेल्याने प्रवाशांचे हाल झाले. वीस मिनिटांच्या जोरदार वारा पावसाच्या झटक्याने शहरातील जनजीवन मात्र विस्कळीत केले. वारा पावसाचा जोर ओसरल्यावर मग विजांचा कडकडाट सुरू झाला. पावसाच्या थोड्याशा झटक्याने वातावरण मात्र थंडगार झाले. वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना काळोख व्यवहार करावे लागत होते.