अंबरनाथ : पक्षातील फुटीनंतर शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अंबरनाथमध्ये येणार आहेत. गेल्या महिन्यात अंबरनाथ शहरातील शहर अध्यक्षांसह माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. यानंतर अंबरनाथमध्ये संताप व्यक्त होत होता. त्यानंतर नव्या शहराध्यक्षाची निवड करण्यात आली. आता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे अंबरनाथ आणि कल्याण डोंबिवली शहरात येत असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या महिन्यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर अध्यक्षासह माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवेसेनेत प्रवेश केला होता. यात कुणाल भोईर, संदिप लकडे, स्वप्निल बागुल, अपर्णा भोईर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या पक्षप्रवेशानंतर शहरात मनसेतून संतापाची लाट उसळली होती. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर टीका केली होती. त्यांना नोटांची बंडले दाखवत आंदोलन केले होते. तर गेले ते फक्त पैशांसाठी गेले. त्यांना येत्या पालिका निवडणुकीत जागा दाखवणार असा इशाराही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता.
त्यानतंर अविनाश जाधव यांनी शहरात भेट दिली होती. अविनाश जाधव यांनी गेलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला होता. ज्या लोकांनी माजी आमदार राजू पाटील यांना त्रास दिला, त्यांच्यासोबत तुम्ही कसे जाऊ शकता, असा प्रश्नही अविनाश जाधव यांनी उपस्थित केला होता. तसेच कंत्राटांसाठी दुसऱ्या पक्षात गेलेल्यांच्या प्रभागातील विकासकामांची माहिती घ्या. त्यांच्या कामातील भ्रष्टाचार बाहेर काढा असे आवाहनही जाधव यांनी मनसैनिकांना केले होते. त्यानंतर काही दिवसातच ठाणे दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरेंनी जुने निष्ठावंत पदाधिकारी शैलेश शिर्के यांची नवी शहराध्यक्ष म्हणून निवड केली होती.
पक्षाच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता अंबरनाथ शहरात हजेरी लावण्याचे ठरवले आहे. शुक्रवारी राज ठाकरे अंबरनाथ शहरात येणार असल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी राज ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात आणि निवडणुकीच्या तोंडावर काय कानमंत्र देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.
कल्याण डोंबिवलीतही संवाद साधणार
शिवसेना शिंदे गटाने गेल्या काही दिवसात कल्याण लोकसभा या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात मनसेला खिंडार पाडले आहे. डोंबिवलीतील काही मोठ्या पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतही राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरेंची ही भेट पक्षाच्या बांधणीसाठी कशी फायदेशीर ठरते हे आगामी काळात स्पष्ट होईल.