ठाणे : आपल्या आजूबाजूला निर्माण झालेली परिस्थिती आणि गढूळ झालेले राजकीय वातावरण यावर साहित्यिकांकडून त्या त्या वेळी भाष्य होणे गरजेचे आहे, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. मराठीपण काय असते, हे जगाला कळण्यासाठी आपल्याकडील मराठी साहित्याचा इतर भाषेत अनुवाद होणे गरजेचे असून त्यासाठी माझा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रावण पब्लिशिंग हाऊसतर्फे कुसुमाग्रजांचा अप्रकाशित कवितांचा संग्रह तयार करण्यात आला आहे. त्याचे प्रकाशन ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाले. मनसे नेते अभिजित पानसे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आपल्याकडे अनेक साहित्यिक होऊन जातात, पण त्यांना महत्व प्राप्त होत नाही. योग्यवेळी ते भाष्य करत नाहीत म्हणून त्यांना महत्व प्राप्त होत नाही. साहित्यिकांना परमेश्वराने शब्दांची ताकद दिलेली आहे. आपल्या आजूबाजूला निर्माण झालेली परिस्थिती आणि गढूळ झालेले राजकीय वातावरण यावर साहित्यिकांकडून त्या त्या वेळी भाष्य होणे गरजेचे आहे. असे केले तर साहित्यिकांचे महत्वही वाढेल, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>>कसबा निवडणूक हरल्यामुळे ब्राह्मण भोजन सुचले का ? राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा खोचक सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लहानपणी घोकंपट्टी करून कविता शिक्षकांसमोर ऐकवल्या होत्या. पण, ती कविता समजूनही घ्यायची असते, हे खूप नंतर कळायला लागले, असे त्यांनी सांगितले. ‘पन्नशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका’ ही कुसुमाग्रजांची कविता सादर करत ती सध्याच्या राजकीय परिस्थितीला तंतोतंत लागू होत असल्याचे त्यांनी सांगितले. आताची जी परिस्थिती देशात आणि राज्यात दिसते. खासकरून महाराष्ट्रमध्ये हे राजकारण्यांना किती समजणारे आहे, मला माहिती नाही. मी कित्येकदा स्वतःला राजकारणी म्हणून पण घेत नाही. राजकारण्यांना समजत नसेल तर ती किमान जनतेला तरी समजली पाहिजे. राज्यातील प्रत्येकाने ही कविता घरात लावावी. ही कविता रोज वाचावी आणि जो चुकत असेल त्याला पाठवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मराठीपण काय असते, हे जगाला कळण्यासाठी आपल्याकडील मराठी साहित्याचा इतर भाषेत अनुवाद होणे गरजेचे आहे. मी गेले अनेक वर्ष यासाठी प्रयत्न करतोय. चांगला अनुवाद करणारी माणस शोधत आहे, असेही ते म्हणाले.