लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज, शुक्रवारपासून ठाणे आणि पालघर जिल्हा दौरा सुरू होणार आहे. या तीन दिवसीय दौऱ्यामध्ये पक्ष कार्यालयांचे उद्घाटन, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका, पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम, पत्रकार आणि प्रतिष्ठीत नागरिकांच्या भेटीगाठी अशा कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याच्यानिमित्ताने मनसे जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असून आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील सत्ताबदलाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे जिल्ह्याचे राजकीय महत्व गेल्या वर्षभरात वाढले आहे. या जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. या जिल्ह्यात आपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून सुरु असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात एकेकाळी मनसेचीही मोठी ताकद होती. महापालिकांमध्ये मनसेचे नगरसेवक होते. परंतु गेल्या काही वर्षात नगरसेवकांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी आमदार प्रमोद पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत आणि तेही ठाणे जिल्ह्यातील आहेत.

हेही वाचा… नवी मुंबई परिवहन सेवेच्या बस चालक, वाहकाला मारहाण

कल्याण ग्रामीण मतदार संघातून आमदार प्रमोद पाटील हे मनसेच्या तिकीटावर निवडुन आलेले आहेत. तसेच यापुर्वी जिल्ह्यात झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले आहे. तसेच पक्षाची ताकद वाढविण्याचे प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून सातत्याने राज ठाकरे यांच्या दौऱ्यांचे आयोजन केले जात आहे. अशाच प्रकारे राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे पुन्हा आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा… सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आनंद आश्रमाबाहेर जल्लोष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे यांचा आज, शुक्रवारपासून ठाणे आणि पालघर जिल्हा दौरा सुरू होणार आहे. सोमवार, १५ मेपर्यंत हा दौरा असणार आहे. या कालावधीत ते मिरा-भाईंदर, वसई, विरार, नालासोपारा, भिवंडी, शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे शहर असा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्यानिमित्ताने मनसे जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असून आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.