ठाणे : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे (Rajan Vichare) आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के (Naresh mhaske) यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून वाकयुद्ध रंगले आहेत. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसून दोघांचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. राजन विचारे यांनी “अतिरेकी मारले म्हणजे मेहेरबानी केली का” असे विधान केल्याचे सांगत नरेश म्हस्के यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्याला आता विचारे यांनी समाज माध्यमांवर एक पत्र पोस्ट करत त्यातून प्रतिउत्तर दिले असून त्यात “पराचा कावळा करत माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केला”, असे स्पष्टीकरण दिले आहे.

‘अतिरेकी मारले म्हणजे मेहेरबानी केली का? पहलगाम आपल्या देशात आहे, पाकिस्तानमध्ये नाही. आज या घटनेला शंभर दिवस झाले, २७ कुटुंब उध्वस्त झाली आहेत आणि एवढ्या दिवसांनी जर दहशतवादी पकडले जात असतील तर मोठा डंका वाजवण्याची काय गरज? असे राजन विचारे यांनी विधान केले होते. त्यातील ‘अतिरेकी मारले म्हणजे मेहेरबानी केली का’ या विधानावरून खासदार म्हस्के यांनी विचारे यांच्यावर टीका केली होती. त्याला विचारे यांनी पत्राद्वारे प्रतिउत्तर दिले आहे. मी केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढत नरेश म्हस्के यांनी पराचा कावळा केला. माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या वाचाळ टिकेवर राष्ट्रभक्ताचं हे प्रत्युत्तर, असे विचारे यांनी पत्रात म्हटले आहे.

मनसेच्या नेत्याने डिवचल्यावर घराबाहेर पडला

वाचाळवीर हीच उपाधी तुम्हाला योग्य आहे. आमच्यावर काँग्रेसच्या वळचणीला गेल्याचे टीका करतो, पण एकेकाळी एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून तू काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होतास हे आठवते का? आणि तेव्हा याच राजन विचारेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर तुला शिवसेनेत परत आणले याचा विसर पडू देऊ नकोस. करोना काळात उंदरासारखा घरातल्या बिळात लपलेला तू, ठाण्यातील मनसेच्या नेत्याने डिवचल्यावर घराबाहेर पडला होतास. गद्दारी नसानसामध्ये भिनलेल्या तुझ्यासारख्यांनी आम्हाला देशभक्तीचे धडे देताना मी आजवर केलेल्या कामाची नुसती यादी आठव, म्हणजे तुला कळेल, गद्दार कोण आणि देशप्रेमी कोण ते, असा सूचक इशारा विचारे यांनी दिला आहे.

घाणेरडे राजकारण करायची जणू सवयच जडली

देशप्रेम मला काय शिकवतो, मुंबई मधील २६ / ११ च्या हल्यानंतर आम्ही ठाण्यात पहिले स्मारक शहीद उद्यानच्या रूपाने उभारले आहे. त्याच शहीद उद्यानात कारगिल दिवस, प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना आम्ही शहिदांच्या आठवणीत भारावून जातो. याच कार्यक्रमाला आम्ही तुला कित्येक वेळी प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले आहे. त्यामुळे नरेश हे फक्त तुझ्या स्मरणात राहू दे आणि मी जे काही विधानं केली, त्यात सैन्याच्या अवमानाचा प्रश्नच येत नाही. तुला फक्त घाणेरडे राजकारण करायची जणू सवयच जडली आहे. त्यामुळे आता तरी प्रगल्भ बुद्धी वापरण्यास सुरुवात कर, असा सल्लाही विचारे यांनी दिला आहे.

तुझे जुने धंदे आता तरी सोड

१९९३ पासून तीन वर्षे दहशतवादी हल्ल्यामुळे अमरनाथ यात्रा जेव्हा बंद होती, त्यांनतर १९९६ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक आवाहन केले होते, प्रत्येक हिंदूंनी अमरनाथ यात्रेला जायलाच हवं असे त्यांचे आदेश येताच त्यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गर्शनाखाली आम्ही जीवाची पर्वा न करता गेली २८ वर्षे सातत्याने यात्रेला जात आहोत. तिथल्या सीमेवर असलेले आर्मी जवान, बीएसएफ, सीआरपीएफ आणि स्थानिक जम्मू काश्मीर पोलीस यांच्यामुळेच आम्ही आतापर्यंत सुरक्षित प्रवास करू शकलो. एकदा श्रीनगरमधील लाल चौक येथे शंकराचार्याना भेटायला गेलो असता तेथे बॉम्बस्फोट झाला. त्या हल्यातून सुद्धा आम्ही बचावलो. मात्र एक लक्षात ठेव, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिलेले संस्कार आहेत. पहिला देश, नंतर धर्म हे आम्हाला शिकवले. त्यामुळे तू आम्हाला अजिबात देशप्रेम आणि हिंदुत्व शिकवू नकोस. श्री मलंग गडावर एवढ्या वर्षांत एकदातरी तू पायी चढलास का रे तू? त्या गडाखाली बसून खुशमस्कऱ्या, लावालावी करायचे हे तुझे जुने धंदे आता तरी सोड. तू आता सध्या ज्यांचे मीठ खातोस त्यांची सुद्धा निंदा नालस्ती करतोस. त्यांना काय कळते हे माझे डोके असे शब्द वापरून स्वतःचा फायदा करून घेतोस, अशी टीका विचारे यांनी केली आहे.

तुझी औकात काय होती हे विसरू नकोस

टेंडर सेटर म्हणून तुझी ख्याती सर्वदूर आहे. वाचाळवीर तुला बोललो हे खरंच आहे, पण वाचाळवीर बोलल्याने तुला एवढ्या मिरच्या झोंबल्या? अरे नरेश, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे स्वतः ठाण्यात आले आणि तुला महापौर खुर्चीत बसवले याची तरी जाणीव ठेवशील की नाही. खाल्या मिठाला जागशील की नाही?.. अरे ज्या ताटात खाल्लेस त्या ताटात घाण करणे अशी तुझी ओळख अख्ख्या महाराष्ट्राला ज्ञात झाली आहे. दुसऱ्यांच्या विकासाच्या कल्पना चोरणारा, दुसऱ्यांच्या आयडिया स्वतःच्या नावावर खपवणारा तू. तुला उंदीर म्हटलं ते उगाच नाही. तू इकडून तिकडे उड्या मारू शकतोस हे सर्व ठाणेकरांना माहीत आहे. तुला एवढीच खुमखुमी असेल तर यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर तुला देईन, पण आमचे दैवत हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख

बाळासाहेबांचे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे आम्हावर संस्कार आहेत. त्यामुळे खबरदार! यापुढे शिवसेना आणि ठाकरे ब्रँड आणि माझ्याशी बोलताना तुझी औकात काय होती हे विसरू नकोस, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

काँग्रेसमध्ये जाण्यापासून मी थांबवला आणि म्हणूनच

नरेश तू किती सर्वज्ञानी आहेस आणि राजन विचारे काय चीज आहे हे समस्त ठाणेकरांना माहीत आहे. एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून मार्गारेट अल्वा यांच्या उपस्थितीत ठाण्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात तुझा काँग्रेस प्रवेश होणार होता, पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे तुला काँग्रेसमध्ये जाण्यापासून मी थांबवला आणि म्हणूनच तुझी आजची ओळख आहे हे विसरू नकोस. याचे भान ठेव, असा सल्ला विचारे यांनी दिला आहे.

मला तुझे पुस्तक उघडायला लावू नकोस

तुझ्यासारख्या लबाडाने खासदारकीची निवडणूक कशी जिंकली हे सर्वांना माहीत आहे. बोगस मतदान नोंदणी करून विजय मिळवलात याचाही भांडाफोड लवकरच होईल. तेव्हा दिल्लीत असताना चामोगिरी करताना सर्व ठिकाणी कॅमेरे लागले आहेत, त्यामुळे याचे ही भान ठेव. घरापासून ते संसद भवनापर्यंत कॅमेरे तुमच्यावर नजर ठेवून आहेत. दिल्ली तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे उगाच आमच्या वाटेला जाऊ नकोस. मातोश्री, उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षाबद्दल बोलताना जरा जपून. तुला एकच सल्ला देतो की, सुसंस्कृत राजकारण कर. मला तुझे पुस्तक उघडायला लावू नकोस, नाही तर भारी पडेल, असा इशारा विचारे यांनी दिला आहे.