कल्याण : आपण महाराष्ट्र राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते आहोत. महायुतीचा धर्म पाळत वर्तन करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत डोंबिवलीचे आमदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मागील काही महिन्यांपासून डोंबिवली पश्चिमेत अधिक प्रमाणात लक्ष देऊन, आपण डोंंबिवली पश्चिमेचे प्रदेशाध्यक्ष आहोत असे दाखवून देत आहेत, अशी बोचरी टीका शिंदे शिवसेनेचे डोंबिवली उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यावर केली आहे.

महायुती धर्म पालन म्हणून शिंंदे शिवसेनेने भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या पक्षात घ्यायचे नाही आणि त्याच युती धर्माप्रमाणे भाजपने शिंदे शिवसेनेतील कोणाही नगरसेवक, कार्यकर्त्याला भाजपमध्ये प्रवेश द्यायचा नाही, असे ठरले असताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शिंदे शिवसेनेचा नगरसेवक, इच्छुक पदाधिकारी असलेल्या प्रभागात मनसे नगरसेवकाला विकास निधी देणे, तेथील शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता भाजपला गळाला लागेल यासाठी प्रयत्न करत आहेत.

मागील महिन्यांपासून रवींद्र चव्हाण यांची कृती पाहिली तर ते डोंबिवली पश्चिमेतील प्रत्येक पालिका प्रभागांमध्ये अतिशय तळमळीने लक्ष घालत आहेत. जे काम स्थानिक पदाधिकाऱ्याचे आहे. तेथे प्रदेशाध्यक्ष सारखा नेता लक्ष घालत असेल तर मग चव्हाण हे डोंबिवली पश्चिमेचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो, असा सवाल उपजिल्हाप्रमुख कदम यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी राज्यातील महायुती सरकार काम करत आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वता देश, राज्यातील डबल इंजिन सरकार नंतर आता आपणास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांंमध्ये यश मिळवून ट्रिपल इंंजिनचे सरकार आणायचे आहे असे सांगत आहेत.

हे साध्य करायचे असेल तर महायुती धर्माचे पालन, महायुतीचे नेते, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणे आवश्यक आहे. शासनाचा निधी असताना प्रभागात विकास कामांंचे फलक लावताना त्यावर फक्त भाजपचेच नेते, कार्यकर्ते यांच्या प्रतिमा लावण्यात येत असतील तर युती धर्माचे पालन कोण करत नाही, याचे आत्मपरिक्षण प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी करणे आवश्यक आहे, असा सल्ला कदम यांनी भाजपला दिला आहे.

पक्ष, सत्तास्थान याचा विचार न करता मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी अडिच वर्षाच्या काळात विकास कामांचा धडाका लावला. त्यानंतर महायुती सरकार आणि मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. महायुती धर्म पालनातून हे सर्व साध्य झाले. आता त्याचा विसर पडून प्रदेशाध्यक्ष चव्हाण हे महायुतीमधील विरोधकांना संपविण्यासाठी जिवाचे रान करत असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते पक्षात घेऊन शिंदे शिवसेनेला डिवचत असतील तर मग आम्ही का गप्प बसावे.

प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्ष विस्तार, कार्यकर्ते वाढविणे हे त्यांचे काम आहे. म्हणून शिवसेनेच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना ते महायुती धर्माचा विचार न करता आपल्या पक्षात घेत असतील तर मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कच्च्या गुरूचे चेले नाहीत. त्यांनी संयम सोडला तर मग महायुतीत मिठाचा खडा पडेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप संयम पाळला आहे. तो सोडावा म्हणून प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेवरून आम्ही उपमुख्यमंत्र्यांना गळ घातली आहे, असे कदम यांनी सांगितले.

हे शीतयुध्द असेच सुरू राहिले तर मग महायुतीत काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल, असा इशारा कदम यांनी दिला आहे.

एक सामान्य कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष असा निष्ठावान रवींद्र चव्हाण यांचा कष्टाचा, मेहनतीचा प्रवास आहे. दल बदलूपणा करून त्यांनी पद मिळवले नाही. त्यामुळे राजेश कदम यांंनी आपण कोणा विषयी बोलतोय याचे भान ठेवावे. मालवण, अंबरनाथ या सर्व वर्षभरात घडलेल्या घटनांमध्ये महायुती धर्माचे पालन कोण करत नाही याचे चिंतन कदम यांनी प्रथम करावे. मग भाजपला महायुती धर्म पालनाचे उपदेश करावेत. डोंबिवली हा चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे येथील प्रत्येक प्रभागात विकास कामात लक्ष घालणे त्यांचे काम आहे. राजेश कदम यांनी आपल्या जीभेला बांध घालावा. – नंदू परब, भाजप जिल्हाध्यक्ष, कल्याण जिल्हा.