डोंबिवली: मागील सात वर्षापासून शिळफाटा रस्त्यावरील रखडलेल्या पलावा पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. या रखडलेल्या पुलामुळे प्रवाशांना दररोज वाहन कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. हा रखडलेला पूल झटपट पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा, या मागणीसाठी शनिवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, मनसेचे माजी आमदार राजू पाटील पलावा पुलाच्या ठिकाणी एकत्र आले.
ठाकरे पक्ष, मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी पलावा पूल सुरू करण्याच्या मागणीसाठी शेकडोच्या संख्येने जमा झाले होते. कल्याण ग्रामीणचे शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी ३१ मेपर्यंत पलावा पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असे आश्वासन नागरिकांना दिले होते. या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने आणि मागील सात वर्षापासून पलावा पुलासंदर्भात प्रवाशांना फक्त आश्वासनांची गाजरे दाखविण्याची कामे या भागाच्या लोकप्रतिनिधींकडून सुरू असल्याने त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी माजी आमदार राजू पाटील, जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे एकत्र आले होते.
जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पलावा पूल उद्घाटनाची एक उपहासात्मक निमंत्रक पत्रिका तयार केली होती. ‘पलावा पुलाचे आश्वासन कधीच संपले नाही आणि पलावा पूल कधीच पूर्ण झाला नाही,’ अशी टोलेबाजी या पुलाच्या मार्गात अडथळे ठरणाऱ्या लोकप्रतिनिधींवर करण्यात आली होती. हा सगळा रोख शिंदे शिवसेनेतील विकासपुरूष लोकप्रतिनिधींच्या दिशेने होता. त्यामुळे पलावा पुलाच्या ठाकरे पक्षाच्या निषेध आंदोलनात सहभागी होण्याचा कोणताही पूर्वनियोजित कार्यक्रम माजी आमदार राजू पाटील यांनी जाहीर केला नव्हता. तरीही, रखडलेल्या पुलाच्या कामासाठी ठाकरे पक्ष आंदोलन करत असल्याबद्दल त्यांना समर्थन देण्यासाठी आणि अप्रत्यक्षपणे या भागात विकासाच्या नावाने मिरविणाऱ्या शिंदे शिवसेनेतील लोकप्रतिनिधींना डिवचण्यासाठी माजी आमदार पाटील यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
पलावा चौकातील काही दुकाने हटविण्यास काही राजकीय नेत्यांचा विरोध आहे. या कचाट्यात पलावा पूल मागील सात वर्षापासून रखडला आहे. या रखडलेल्या पुलाचा प्रवाशांना कोंडीच्या माध्यमातून त्रास होत आहे. पूल सुरू होणार या नावाने फक्त लोकांना चाॅकलेट, गाजरांची आश्वासने दिली जातात, अशी उपरोधिक टीका दीपेश म्हात्रे यांनी केली.
सामान्य जनतेच्या प्रश्नांवर आम्ही सदैव एकत्र आहोत. ही लढाई, आंदोलन कोणत्याही पक्षाच्या विरूध्द नाही. शिळफाटा रस्त्यावर सात वर्षापासून पलावा पूल रखडल्याने प्रवाशांना वाहन कोंडीचा जो त्रास सहन करावा लागतो. या नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहेत. – दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
जिल्ह्यातील शिळफाटा हा एक महत्वाचा महामार्ग आहे. प्रवाशांबरोबर लांब पल्ल्याची मालवाहतूक या रस्त्याने होते. सात वर्षापासून या रस्त्यावरील पूल रखडविण्यात आला आहे. हे सर्वांनाच लांच्छानास्पद आहे. याविषयी लोकांच्यासाठी आम्ही या आंदोलनात सहभागी झालो. – राजू पाटील, माजी आमदार.