ठाणे : लोकसभा निवडणूक प्रचारात महायुतीच्या नेत्यांकडून श्री राम मंदिर उभारणीचा उल्लेख केला जात असतानाच, आता ठाकरे गटाचे ठाण्यातील उमेदवार राजन विचारे यांनी चैत्र नवरात्रोत्सवात रामाची प्रतिकृतीसह मंदिराचा मोठा देखावा उभारला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात साजरा होणाऱ्या उत्सवाच्या माध्यमातून ठाकरे गटाने निवडणूक प्रचारात राम मंदिराचा मुद्दा घेऊन भाजपला शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे.

ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने चैत्र नवरात्रोत्सव साजरा होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे यांच्याकडून या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. उत्सवाचे २९ वे वर्ष असून यापूर्वी चरई भागात १२ वर्षे हा उत्सव साजरा होत होता. गेल्या १७ वर्षांपासून मैदानात हा उत्सव साजरा होत आहे. याठिकाणी देवीच्या दर्शनाला भावीक मोठ्या संख्येने येतात. या उत्सवात ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनीही राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. या मंदिराची उंची ७० फूट आहे. देवीचा सभा मंडप २४×२४ फुटाचा आहे. त्यामध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा गाभारा १६×१६ फुटाचा आहे. ४०X४०`नऊ’ हवनकुंड असलेला मंडप आणि त्या भोवतालचा प्रदक्षिणा मार्ग आहे. याठिकाणी रामाची मोठी प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

हेही वाचा – ठाणे : डायघर कचरा प्रश्न पेटणार, मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी

हेही वाचा – तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड

अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यावरून राजकारण तापले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिर उभारण्यात आल्याचा मुद्दा भाजपच्या नेत्यांसह महायुतीचे नेते उपस्थित करत आहे. लोकसभा निवडणूक प्रचार मेळाव्यातही महायुतीच्या नेत्यांकडून राम मंदिर उभारणीचा उल्लेख केला जात आहे. भाजपला शह देण्यासाठी ठाण्यात ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी नवरात्रोत्सवात राम मंदिर प्रतिकृती उभारल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर यानिमित्ताने राम मंदिराबद्दल आस्था असल्याचे ठाकरे गटाने दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.