रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांवर

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७ टक्के इतके आहे. तसेच बाधित रुग्णांचे प्रमाण हे ७. ४५ टक्के इतके आहे. करोनाबाधित रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे रुग्णांवर घरीच उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्यामुळे रुग्णवाढ होत असली तरी रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात आठवडय़ाभरापासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे आढळून येत आहे.  मंगळवारी जिल्ह्यात दररोजच्या रुग्णसंख्येने साडेतीन हजार रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढत असली तरी बाधित रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवापर्यंत जिल्ह्यात ७.४५ टक्के करोनाबाधित रुण आढळून येत आहेत. तर, रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे ८ लाख ९१  हजार ४८७ एवढया करोना चाचण्या केल्या जात आहेत. जिल्ह्यात ६ हजार ३१८ सक्रिय रुग्ण असून त्यापैकी ९०० रुग्ण हे करोना काळजी केंद्रात उपचार घेत आहेत. २४९ रुग्ण करोना रुग्णालयात, ४६४ रुग्ण करोना आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत. तर ३ हजार ३९६ रुग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. ३४४ रुग्ण प्राणवायू खांटांवर असून २६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

प्राणवायू मुबलक

 जिल्ह्यात हवेतून प्राणवायू निर्माण करणारे ३१ प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यापैकी २६ प्रकल्प पूर्ण झाले असून त्या माध्यमातून ४५ मेट्रिक टन प्राणवायूची निर्मिती होत आहे. तसेच सध्या ६७२ मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा साठा निर्माण करण्याची क्षमता जिल्ह्यात उपलब्ध करण्यात आली असून आणखी २७० मेट्रिक टन साठवणूक क्षमता विकसित करण्याचे काम प्रगतिपथावर केले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 

नागरिकांसाठी मदत क्रमांक

करोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शहरात उपलब्ध असलेली करोना रुग्णालये, खाटांची व्यवस्था, रुग्णवाहिका त्यासह इतर मूलभूत माहिती नागरिकांना तात्काळ मिळण्यासाठी मदत क्रमांक तयार करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेची कोविड वॉर अधिक सक्षम करण्यात आली असून नागरिकांनी ९१- ७३०६३ ३०३३० या वॉर रूमच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

जिल्ह्यात २४ एप्रिल २०२१ मध्ये एकाच दिवशी सर्वाधिक ८३ हजार सक्रिय रुग्ण संख्या होती. त्यावेळी २१९ मेट्रिक प्राणवायूची आवश्यकता होती. आता या रुग्णसंख्येच्या तीनपट म्हणजे ६५७ मेट्रिक टन प्राणवायू उपलब्धतेसाठी नियोजन केले जात आहे.

राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे