रेल्वे अर्थसंकल्पाचे विश्लेषण होऊनही अनेक दिवस झाले. या अर्थसंकल्पात मुंबईला काय मिळाले, महाराष्ट्राला काय मिळालं, याच्या चर्चाही रंगल्या. मात्र ठाण्यापल्याडच्या वाहतुकीसाठी नेमके काय मिळणार आहे..?
गे ल्या काही वर्षांपासून एक इव्हेंट बनलेला रेल्वेचा अर्थसंकल्प जाहीर झाला आणि प्रभूकृपा झाली, प्रभूंची अवकृपा झाली, असा सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काही मिळो न मिळो, ठाण्यासाठी खूप काही मिळाले आहे. ठाणे आणि त्यापल्याडच्या शहरांपर्यंत जाणारी रेल्वे वाहतूक अधिक सुलभ व्हावी, यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याशिवाय गेल्या काही वर्षांमध्ये घोषणा झालेल्या आणि अद्याप कागदावरच असलेल्या काही प्रकल्पांसाठीही निधीची घोषणा करण्यात आली आहे.
कल्याण, डोंबिवली, कळवा, मुंब्रा आदी ठिकाणी राहणाऱ्या प्रवाशांसाठी या अर्थसंकल्पातील दिलासादायक बाब म्हणजे या कल्याण-वाशी या रेल्वेमार्गासाठी केलेली ४२८ कोटी रुपयांची तरतूद! एमयूटीपी-३ या अंतर्गत असलेल्या या प्रकल्पाची घोषणा आधीच करण्यात आली होती. मात्र या प्रकल्पासाठी ठोस निधी नव्हता. ट्रान्स हार्बर मार्ग सुरू झाल्यापासून या मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत नेमाने वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तर ही संख्या चांगलीच वाढली आहे. मात्र कल्याण, डोंबिवली किंवा ठाण्यापल्याडच्या स्थानकांवरून ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ठाण्याला उतरण्याचं दिव्य करावं लागत होतं. ठाण्याला प्लॅटफॉर्म क्रमांक चार किंवा सहाला उतरून गर्दीत धक्केखात ब्रिज चढून धावतपळत ट्रान्स हार्बर मार्गावरील प्लॅटफॉर्म गाठण्याची कसरत प्रवाशांना करावी लागत होती.
हा त्रास वाचावा, यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा होता. या प्रकल्पांतर्गत कळवा ते ऐरोली या दरम्यान एक उन्नत रेल्वेमार्ग बांधण्यात येणार आहे. या मार्गाचे सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. मात्र हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात येण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी जाणार आहे. तोपर्यंत या ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या संख्येतही वाढ होणार आहे.
या अर्थसंकल्पातील ठाणेकरांसाठीची आणखी सुखावह बाब म्हणजे विटावा ते ठाणे यादरम्यान बांधण्यात येणारा पादचारी पूल. या ठिकाणी महिन्यातून किमान १५ ते २० प्रवासी मृत्युमुखी पडतात. याबाबत रेल्वे आणि ठाणे पालिका यांनी एकत्र येत काम करण्याची गरज होती. मात्र रेल्वे आता याबाबत ठोस पावले उचलत या पुलाचे काम हाती घेणार आहे. पुढील आíथक वर्षांपर्यंत हा पूल पूर्ण होण्याची शक्यता आहे.
त्याशिवाय पनवेल-कर्जत या मार्गाचे दुहेरीकरण हीदेखील या अर्थसंकल्पातील दिलासादायक बाब आहे. मात्र, असे असूनही काही बाबतींत हा रेल्वे अर्थसंकल्प ठाण्यापुढील प्रवाशांची निराशा करणारा आहे. या अर्थसंकल्पात कल्याण ते कर्जत व कल्याण ते कसारा या मार्गाच्या चौपदरीकरणाबाबत काहीच भाष्य करण्यात आलेले नाही. गेल्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा झाली असली, तरी त्यासाठी पुढे काही तरतूद करण्यात आल्याचेही काहीच ठोस सांगितलेले नाही.
कल्याणच्या पुढे कसारा मार्गावर काही स्थानकांबाबतची प्रवाशांची मागणीही प्रलंबित आहे. मात्र रेल्वेच्या नकाशावर आणखी नवी स्थानके आणण्याचा विचार या अर्थसंकल्पात तरी करण्यात आलेला नाही. भिवंडीला उपनगरीय रेल्वेमार्गाच्या नकाशात आणून तेथे उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबतची मागणीही खूप जुनी आहे. मात्र या प्रकल्पाचा उच्चार या अर्थसंकल्पात झाला नाही. परिणामी या प्रवाशांच्या मागण्या प्रलंबितच आहेत.
प्रत्येक अर्थसंकल्पात प्रवाशांच्या प्रत्येक मागणीचा विचार होऊ शकत नाही. मात्र तरीही ठाण्यापल्याडच्या प्रवाशांच्या अनेक मागण्यांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.