लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: मागील काही दिवसांपासून कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील काटई गावाजवळील आंगण ढाब्याच्या समोर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदाराने उंचवटा गतिरोधक बांधला होता. या गतिरोधकामुळे काटई गावाजवळ वाहनांची गती संथ होत असल्याने सकाळ, संध्याकाळ काटई परिसरातील रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत होत्या.

महामार्गावर, सर्वाधिक वाहन धावसंख्या असलेल्या भागात कोठेही गतिरोधक टाकण्याची पध्दती नाही. तरीही शिळफाटा रस्त्यावर ठेकेदाराने गतिरोधक बांधल्याने प्रवासी, वाहन चालक आश्चर्य व्यक्त करत होते. गतिरोधका जवळ वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. मागील काही महिन्यांपासून शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाची कामे बहुतांशी पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहने सुसाट वेगाने धावतात. प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा-१८ जुलैपर्यंत जड वाहनांना घोडबंदर मार्गावर मेट्रो कामामुळे रात्री बंदी

अचानक कोणतेही कारण नसताना काटई गावाजवळ आंगण धाब्याच्या समोरील रस्त्यावर ठेकेदाराने गतिरोधक बांधला होता. हा गतिरोधक उंचवटा असल्याने वाहने या गतिरोधकावरुन जोरात आपटत होती. वाहनाचा आस तुटण्याची भिती वाहन चालकांना असल्याने ते या भागातून वाहने हळूहळू नेत होते. वाहने संथगती झाली की त्याच्या पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा रांगा लागत होत्या. अवजड ट्रेलर, वाहन या मार्गिकेत आले तर वाहनांचा वेग आणखी मंदावत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गतिरोधकामुळे वाहन कोंडीचा प्रकार होत असल्याने काटई गावचे रहिवासी नरेश पाटील यांनी संबंधितांना गतिरोधकामुळे कोंडी होत असल्याचे निदर्शनास आणले होते. अनेक प्रवाशांनी थेट एमएमआरडीसीच्या वरिष्ठांना संपर्क करुन काटई गावाजवळील गतिरोधक हटविण्याची मागणी केली होती. ‘लोकसत्ता’ने यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केले होते. प्रवाशांचा रेट्यामुळे अखेर ठेकेदाराने काटई गावाजवळील कोंडीला आमंत्रण देणारा गतिरोधक रविवारी दुपारी काढून टाकला. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहने आता सुसाट धावू लागली आहेत.