डोंबिवली – डोंबिवलीतील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ डाॅक्टर दिलीप महादेव ठाकूर यांचे सोमवारी संध्याकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात विवाहित कन्या डाॅक्टर मानसी, जावई, नात असा परिवार आहे. मागील काही महिन्यांपासून डाॅ. ठाकूर आजारी होते.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर चाळीस वर्षापूर्वी डाॅक्टर दिलीप ठाकूर यांनी डोंबिवलीत लक्ष्मी रुग्णालय सुरू केले. चाळीस वर्षाच्या कालावधीत डाॅ. ठाकूर यांनी सामान्यांचा डाॅक्टर या भावनेतून रुग्णसेवा केली. डोंबिवली शहर परिसरातील रुग्णांना लक्ष्मी रुग्णालय हा मोठा दिलासा होता. आपल्या रुग्णालयात आलेला रूग्ण हा माणूस असला तरी तो आपला देव आहे. या विचारातून डाॅक्टरांनी रुग्णसेवा केली. त्याच बरोबर रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनाही तशी शिकवण दिली.
अतिशय शिस्तप्रिय, सचोटी, निष्ठेने आपला वैद्यकीय व्यवसाय त्यांनी केला. वैद्यकीय क्षेत्रातील मास्टर ऑफ सर्जन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई परिसरात रूग्णालय सुरू करून डाॅ. ठाकूर त्या काळात आपल्या रुग्णालयाचा विस्तार करू शकले असते. पण, पहिले सामान्य रुग्णांची सेवा या विचारातून त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला. आर्थिक परिस्थितीने दुर्बल असलेल्या रुग्णाजवळ उपचारासाठी जवळ किती पुंजी आहे याचा विचार न करता त्यांनी रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य दिले. कधी कोणाला आर्थिक कारणासाठी अडवून ठेवले नाही.
रुग्णालयात आलेल्या रुग्ण, नातेवाईकांशी सुसंवाद साधून पहिले ते आपल्या मधाळ बोलण्यातून रुग्णाला निम्म बरा करत. त्यानंतर १५ ते २० मिनिटे रुग्ण, नातेवाईकांशी बोलून त्या रुग्णावर उपचार करत. डाॅक्टरांच्या या उपचार पध्दतीमुळे आपला डाॅक्टर म्हणून दिलीप ठाकूर यांची डोंबिवली परिसरातील जनमानसात प्रतिमा होती. डोंबिवली शहर परिसरातील बहुतांशी लोकप्रतिनिधी, व्यावसायिक डाॅक्टरांचे चाहते होते.
वैद्यकीय व्यवसाय करताना कोणीही पालिका अधिकारी डाॅ. ठाकूर यांच्या टप्प्यात आला की ते कल्याण, डोंबिवली शहरांची रचना, तेथील स्वच्छता, आरोग्य, शिक्षण कसे हवे याचे मार्गदर्शन करत. उद्योजक असेल तर स्थानिक पातळीवर लोकांची गरज काय आहे हे पाहून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची सूचना करत होते. निगर्वी स्वभावाचे डाॅ. दिलीप ठाकूर शिस्तीच्या बाबतीत काटेकोर होते. रुग्णालयातील स्वच्छता, रुग्ण सेवा याबाबतीत ते गंभीर असत. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना डाॅक्टर केले. मुलाचे अलिकडेच निधन झाले. आता डाॅक्टर मुलगी मानसी डोंबिवली एमआयडीसीतील एम. डी. ठाकूर आणि रेल्वे स्थानकाजवळील लक्ष्मी रुग्णालयांचा कारभार पाहतात. वैद्यकीय सेवेतील कामगिरीबद्दल ते धन्वंतरी पुरस्काराचे मानकरी होते.
‘सामान्यांचा डाॅक्टर या विचारातून डाॅ. दिलीप ठाकूर यांनी चाळीस वर्षाच्या काळात रुग्ण सेवा केली. कधी कोणाला कोणत्या कारणासाठी अडून ठेवले नाही. त्यामुळे प्रत्येक रुग्ण, नातेवाईकांच्या मनात त्यांना अढळ स्थान होते. वैद्यकीय क्षेत्रातील डोंबिवलीतील उत्तुंग व्यक्तिमत्व गेले’, अशी प्रतिक्रिया डोंबिवलीतील व्यावसायिक राजभाऊ पाटकर यांनी दिली.
‘शिस्तप्रिय विचारांचे डाॅ. दिलीप ठाकूर सामान्यांना दर्जेदार रुग्णसेवा मिळेल. या विचारातून रुग्णसेवा देत होते. सामान्यांचा डाॅ. ठाकूर मोठा आधार होते,’ अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी दिली.