भिवंडी येथील कल्याण रोड भागातील खासगी रुग्णालयामधील एका डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रक्रियेदरम्यान एका महिला रुग्णाचे छायाचित्र काढून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. मोबाइलद्वारे काढलेली आक्षेपार्ह छायाचित्रे अन्य एका डॉक्टरसह इतरांच्या मोबाइलवर पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात डॉ. मनोज बडोले, डॉ. सरफरोश अन्सारी आणि परिचारिका अफसाना खान या तिघांविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सविस्तर चौकशी सुरू असल्यामुळे अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. भिवंडी येथील वंजारपट्टीनाका परिसरात पीडित महिला राहत असून तिचा पतीही व्यवसायाने डॉक्टर आहे.
पीडित महिलेला पोटाचा आजार होता. त्यामुळे ती भिवंडीतील प्राइम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. या रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरने विनयभंग केल्याचेही पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.