कल्याण – कबुतरांच्या विष्ठा आणि पंखांमुळे होणाऱ्या व्याधींचा विचार करून न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मुंबई महापालिकेने कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. डोंबिवली पूर्वेत नांदिवली रस्त्यावर प्रगती महाविद्यालयासमोरील पालिका जलकुंभ भागात मागील अनेक वर्षापासून हजारो कबुतरांचे आश्रयस्थान आहे. या कबुतरांना काही दात्यांकडून दररोज चार ते पाच पोतड्या खाणे घातले जाते. त्यामुळे या भागातील कबुतरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत.
कबुतरांमुळे असाध्य अशा व्याधी होतात, याची जाणीव झाल्यापासून नांदिवली रस्ता भागातील रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकतानगर नांदिवली रस्ता भागात एक धर्मस्थळ आहे. या धर्मस्थळात दररोज पहाटेपासून भाविक येतात. प्राणीदया दाखविण्यासाठी सकाळपासून या भागात कबतुरांना खाद्य टाकले जाते. दिवसभरात चार ते पाच पोतड्या खाद्य एका इमारतीच्या गच्चीवर टाकण्यात येते. खाद्य खाऊन झाल्यानंतर ही सर्व कबुतरे परिसरातील इमारतींच्या गच्ची, खिडक्या, इमारतींवरील निवाऱ्यांवर बसतात, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
या कबुतऱ्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे आम्ही खिडक्यांना जाळ्या बसून घेतल्या आहेत. जाळी थोडी जरी उघडली तरी कबुतरे थेट घरात प्रवेश करतात. या कबुतरांच्या विषयावर पालिका, पोलीस ठाण्यात तक्रार केली तर नाहक काही प्राणीप्रेमींच्या, भक्तांच्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची भीती असल्याने नांदिवली परिसरातील रहिवासी या विषयावर उघडपणे बोलण्यास किंवा तक्रार करण्यास तयार नाहीत. बाहेरगावी जाताना घर योग्यरितीने बंद केले नाहीतर थेट घरात कबुतरे आपले आश्रयस्थान तयार करतात, असे रहिवासी सांगतात.
मुंबईत दादर येथील कबुतरखाना बंदीच्या विषयावर मुंबई महापालिका प्रशासन आक्रमक झाले आहे. याठिकाणी खाद्य टाकणाऱ्यांवर पालिकेने गु्न्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. त्याच प्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त, आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी नांदिवली रस्ता भागात दौरा करून या भागातील कबुतरांच्या आश्रयस्थानाची पाहणी करावी. या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या कबुतरांना शहराच्या बाहेर विशेष सोय करता येईल का यादृष्टीने विचार करण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कल्याणमध्ये मागणी
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात आर्चिस इमारती परिसरात शेकडो कबतुरे या भागात आश्रय घेऊन आहेत. या भागात घाऊक धान्य बाजार आहे. त्यामुळे वाहनातून पडलेले धान्य टिपण्यासाठी कबुतरे अनेक वर्षापासून या भागात निवार करून आहेत. या भागातील इतर व्यावसायिक या कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे हैराण आहेत. कबतुरांची विष्ठा आणि पंखांपासून असाध्य आजार होतात याची जाणीव झाल्यापासून नागरिक आपल्या घर परिसरातील घोळक्याने राहणाऱ्या कबुतरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करू लागले आहेत.
नांदिवली रस्ता भागात कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे, त्यांच्या उपद्रवामुळे त्रास होतो अशी काही तक्रार अद्याप पालिकेत आली नाही. तरीही या भागात दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे योग्य ती कार्यवाही केली जाईल. – हेमा मुंबरकरसाहाय्यक आयुक्त, फ आणि ग प्रभाग.