डोंबिवली : डोंबिवली पूर्वतील नेरुरकर रस्त्यावरील सुदामवाडी प्रवेशव्दाराच्या कोपऱ्यावर पादचारी दररोज कचरा टाकत असल्याने सुदामवाडी परिसरातील रहिवासी हैराण आहेत. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने पावसामुळे कुजून तो परिसरात दुर्गंधी पसरते. या ठिकाणी पालिकेने कायमस्वरुपी कामगार तैनात करुन याठिकाणी कचऱा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी या भागातील रहिवाशांकडून केली जात आहे.

पालिका कामगारांकडून दररोज या भागात सफाई, कचरा उचलण्याची कामे केली जातात. कामगार स्वच्छता करुन गेले की या भागातील काही रहिवासी, पादचारी दुचाकी, रिक्षा थांबून सुदामवाडी प्रवेशव्दाराच्या कोपऱ्यावर कचरा टाकतात. या भागातील एका जागरुक रहिवासी प्रसाद सप्रे यांनी कचऱ्याच्या ढिगाच्या बाजुला उभे राहून कचरा फेकणाऱ्या पादचारी, रहिवाशांना ही कचरा टाकण्याची जागा नाही. आपल्या दारात पालिकेची घंटागाडी येते त्या वाहनात कचरा टाका म्हणून गेल्या दोन महिन्यापासून उपक्रम राबविला. कचऱ्याच्या बाजुला उभे राहिले की फक्त लोक पुढे निघून जातात. कोणी तेथे नसले की पुन्हा कचरा फेकतात, असे प्रसाद सप्रे यांनी सांगितले.

हेही वाचा : प्लास्टिकचा वापर करणाऱ्या कल्याण, डोंबिवलीतील दुकानदारांकडून पालिकेने वसूल केला दोन लाखाचा दंड

मुख्य वर्दळीचे रस्ते, कोपऱ्यांवर कचरा फेकणाऱ्यांवर नजर ठेवणे आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी माजी उपायुक्त कोकरे यांनी अशा ठिकाणी पालिकेचे कामगार सकाळपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तीन पाळ्यांमध्ये कामगार तैनात केले होते. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणची उघड्यावरची कचरा केंद्र बंद झाली. आताचे घनकचरा उपायुक्त अतुल पाटील यांनी डोंबिवली शहराच्या अनेक भागात उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी काही कामगारांच्या नियुक्त्या कराव्यात. अशीच एक नियुक्ती सुदामवाडी प्रवेशव्दार भागात करावी. जेणेकरुन या भागातील कचरा समस्या कायमची मिटेल, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा : डोंबिवली पश्चिम काही भागाचा वीज पुरवठा आज सात तास बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कचऱ्याच्या ढीग तयार झाला की त्याच्यावर कुत्री प्लास्टिक, त्यामधील खाद्य वस्तू खाण्यासाठी येतात. कचरा इतस्ता पसरवितात. पाऊस सुरू असल्याने या कचऱ्याला दुर्गधी सुटून ती परिसरात पसरते. सुदामवाडी परिसर स्वच्छ राहिल यादृष्टीने स्थानिक रहिवासी पुढाकार घेतात. परंतु, परिसरात काही रहिवासी हेतुपुरस्सर रिक्षा, दुचाकीवरुन येजा करताना सुदामवाडी प्रवेशव्दारावर कचरा फेकतात, असे सुदामवाडी भागातील रहिवाशांनी सांगितले.
आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले सुदामवाडी प्रवेशव्दाराच्या बाजुला नागरिकांनी कचरा फेकू नये म्हणून अनेक वेळा प्रयत्न केले. कामगार त्या ठिकाणाहून निघून गेले की तेथे कचरा टाकला जातो. आता या भागात एक कायमस्वरुपी कामगार नियुक्त करण्याचा विचार आहे. जो रहिवासी, पादचारी या भागात कचरा फेकेल त्याच्यावर दंडात्मक आणि तोच रहिवासी दोन ते तीन वेळ आढळला तर त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल.